
स्वतःच्या शेतामध्ये पीक तर घेतले; मात्र त्यासोबत रोजगारही मिळवला. त्यामुळे शेतकऱ्यांची मेहनत वाया गेली नाही. यातून पुढे एका शेडमध्ये रेशीमकिडे ठेवले जाणार आहेत.
टाकळी ढोकेश्वर : जामगाव (ता. पारनेर) येथे सात शेतकऱ्यांनी एकत्र येत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सात एकर तुतीची लागवड केली. एकीकडे पाऊस व रोगराईमुळे शेतमालाचे नुकसान झाले होते, तर दुसरीकडे या योजनेच्या माध्यमातून तुतीची शेती बहरलेली पाहायला मिळत आहे.
रोजगार हमी योजनेंतर्गत ठकचंद मांढरे, बाबासाहेब मंचरे, सोन्याबापू शिंदे, सुधीर चत्तर, द्वारकाबाई घावटे या शेतकऱ्यांनी दोन महिन्यांपूर्वी शेतात तुतीची लागवड केली. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना शेतात रोजगारही उपलब्ध झाला.
स्वतःच्या शेतामध्ये पीक तर घेतले; मात्र त्यासोबत रोजगारही मिळवला. त्यामुळे शेतकऱ्यांची मेहनत वाया गेली नाही. यातून पुढे एका शेडमध्ये रेशीमकिडे ठेवले जाणार आहेत. त्याद्वारे रेशीम निर्मिती होणार आहे. त्यातून या शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळणार आहे. हा वेगळा प्रयोग शेतकऱ्यांनी केला व तो यशस्वीही झाला.
संततधार पाऊस, ढगाळ वातावरणामुळे अनेक पिके रोगराईने खराब झाली. मात्र, तुतीच्या पानांवर कोणत्याही प्रकारचा रोग पडला नाही. त्यामुळे या भागात तुतीला पोषक वातावरण आहे. तालुक्यातील आणखी काही शेतकऱ्यांनी अशा प्रकारचा प्रयोग केला, तर तो यशस्वी होऊ शकतो.
तुतीसाठी शेतकऱ्यांना एक एकरला तीन लाख 23 हजार 790 रुपये अनुदान मिळते. हे अनुदान तीन वर्षांसाठी आहे.
तालुक्यात एकीकडे पावसाने शेतमालाचे नुकसान झाले म्हणून शेतकऱ्यांचे दुःखी चेहरे पाहिले, तर दुसरीकडे या योजनेच्या माध्यमातून तुतीची बाग फुलविणाऱ्या महिला शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद खूप काही सांगून गेला.
- ज्योती देवरे, तहसीलदार