Videdo : क्वारंटाइन कक्षात साप चावून मुंबईची चिमुरडी गेली.. डॉक्टर म्हणाले, कोरोना असेल, मृत्यूचा दाखलाही देईनात

शांताराम काळे
Friday, 10 July 2020

या घटनेला आता महिना उलटला आहे. तरी त्या मुलीचे मृत्यूचा दाखला मिळाला नाही. त्यासाठी ते पालक दररोज दवाखान्याचे उंबरे झिजवत आहेत. आपली मुलगी नेमकी कशाने गेली. हेही हे प्रशासन सांगू शकत नसेल तर संयमाचा बांध फुटणारच.

अकोले : मुंबई व पुणे येथून आलेल्यांना गावात संस्थात्मक क्वारंटाईन केले जाते किंवा करण्यात येत होते. क्वारंटाइन केलेल्या अशाच एका कुटुंबाबाबत ह्रदय हेलावून टाकणारी घटना घडली. मुलीचा मृत्यू तर झालाच परंतु तिच्या मृत्यूचा दाखला मिळवण्यासाठीही तिच्या पालकांना रूग्णालयात हेलपाटे मारावे लागत आहेत.

गेल्या महिन्यात विश्वास शिंदे व स्वाती शिंदे मुलुंड येथून आपल्या गावी मुलगी अनन्या (वय ५) शिळवंड घोटी येथे आले. ते अगोदर संस्थात्मक क्वारंटाइन झाले. मात्र, त्याच काळात त्यांच्या मुलीला पहाटे सर्पदंश झाला. तिला घेऊन ते दोघे कोतूळ ग्रामीण रुग्णालयात आले. मात्र, तिथे त्यांचे काही एक न ऐकता तुमच्या मुलीला कोरोनासारखी लक्षणे दिसत आहेत. तिला संगमनेर येथे न्या तेथे उपचार होतील, असे सांगून त्यांना तिकडे पाठवण्यात आले.  

हेही वाचा - पत्नीवर होता चारित्र्याचा संशय, त्याने मुलीलाच

या प्रवासादरम्यान त्या चिमुरडीची मृत्यूसोबत लढाई सुरू होती. रुग्णवाहिकेत ना ऑक्सिजन, ना डॉकटर, ना नर्स, ना सलाईन त्यामुळे त्या चिमुरडीला मृत्यूने गाठलेच.

या घटनेला आता महिना उलटला आहे. तरी त्या मुलीचे मृत्यूचा दाखला मिळाला नाही. त्यासाठी ते पालक दररोज दवाखान्याचे उंबरे झिजवत आहेत. आपली मुलगी नेमकी कशाने गेली. हेही हे प्रशासन सांगू शकत नसेल तर संयमाचा बांध फुटणारच. त्या मुलीच्या आईने वेदना लपवत प्रशासनाच्या सावळ्या गोंधळाविरोधात लढा पुकारला आहे. 

या बाबत मृत मुलीचे वडील विश्वास शिंदे यांनी सांगितले, माझी मुलगी अनन्या वय ५ वर्षे हिस सर्पदंश झाला. मी त्या  सापाला  मारले व मुलीला घेऊन सात वाजता ग्रामीण रुग्णालय कोतूळ येथे आलो. तेथे महिला कर्मचारी होत्या. त्यांनी अगोदर लक्ष्य दिले नाही. नंतर मला एक ६८  रुपयांचे इंजेक्शन आणण्यास सांगितले. त्याप्रमाणे मी आणून दिले. मात्र, दहा मिनटात माझ्या मुलीस सर्पदंश नाही तर कोरोनाचे लक्षणे असल्याचे सांगत तातडीने १०८ रुग्णवाहिका बोलावून आम्हाला संगमनेरला पाठविले.

आमच्यासोबत ना नर्स, ना डॉकटर, ना सलाईन, ना सुविधा होत्या. आम्ही जात असताना तिचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर आम्हाला कोणतेही सर्टिफिकेट दिले नाही.

 

मुळातच रुग्ण आणण्यास उशीर झाला होता. त्यामुळे त्या मुलीचा श्वासोच्छवास करण्यास त्रास होत होता. त्यात आंमच्याकडे व्हेंटिलेटर नाही. त्या मुलीला सलाईन लावता येत नसल्याने तातडीने संगमनेरला हलविले. आमच्या रुग्णालयात कर्मचारी संख्याही अपुरी असल्याने सोबत कोणाला पाठवू शकलो नाही.

- डॉ. वानखेडे, वैद्यकीय अधिकारी, कोतूळ, अकोले. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai girl bitten by snake in quarantine room