गावाकडे शेतजमीन आहे का, असेल जाऊन तपासा; कर्जतमध्ये घडलाय भलताच प्रकार

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 16 January 2021

अधूनमधून गावी जाऊन कागदपत्र तपासली पाहिजेत तसे झाले नाहीतर तुमची वडिलोपार्जित इस्टेट गेलीच म्हणून समजा.

नगर ः एकाचा प्लॉट दुसऱ्याला विकण्याच्या घटना शहरी भागात घडत असतात. मात्र, कर्जत तालुक्यात जमीनच परस्पर विकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तुम्ही जर शहरात रहात आणि गावाकडे जमीन असेल तर तुमच्याबाबतही असे घडू शकते. त्यामुळे कधीही सावध राहिलेलं बरं. अधूनमधून गावी जाऊन कागदपत्र तपासली पाहिजेत तसे झाले नाहीतर तुमची वडिलोपार्जित इस्टेट गेलीच म्हणून समजा.

मृत व्यक्‍तीच्या जागी तोतया उभा करून, कर्जत तालुक्‍यातील गुरव पिंप्री येथील जमिनीचे बनावट खरेदीखत केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने आज एकास जेरबंद केले.

पुरुषोत्तम बापूराव कुरुमकर (वय 40, रा. लिंपणगाव, ता. श्रीगोंदे) असे त्याचे नाव आहे. कर्जत तालुक्‍यातील गुरव पिंप्री येथील 22 एकर जमिनीच्या मूळ मालकाचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा - भाजपचे चाणक्य रोहित पवारांच्या भेटीला

असे असताना बनावट खरेदीखत तयार करून आरोपी पुरुषोत्तम कुरुमकर, निंभोरे (रा. घोटवी, ता. श्रीगोंदे) व त्यांच्या साथीदारांनी मिळून ही जमीन एकनाथ बाळासाहेब बांदल (रा. करडे, ता. शिरूर, जि. पुणे) व त्यांच्या साथीदारांना विकली.

हा प्रकार समोर आल्यावर कर्जत पोलिस ठाण्यात कुरुमकर याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. आरोपी कुरुमकर आज नगर परिसरात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून शहरातील लाल टाकी परिसरातून त्यास अटक केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mutual sale of agricultural land in Karjat