Nagar: जळीतकांड प्रकरण : कर्मचाऱ्यांच्या बेपर्वाईचे फुटेजमध्ये भक्कम पुरावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जळीतकांड प्रकरण

जळीतकांड प्रकरण : कर्मचाऱ्यांच्या बेपर्वाईचे फुटेजमध्ये भक्कम पुरावे

नगर : जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात आग लागली तेव्हा कर्तव्यावर असूनही चार जण तेथे नव्हते, याचे भक्कम पुरावे सीसीटीव्हीमध्ये मिळाले आहेत. त्यामुळेच चार जणांना अटक केली आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, रुग्णालयातील जळीतकांड प्रकरणी अटक केलेल्या चौघांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली.

जिल्हा रुग्णालयातील अग्नितांडव प्रकरणी पोलिसांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाखा शिंदे, परिचारिका सपना पठारे, आस्मा शेख आणि चन्ना आनंत या चौघींना अटक केली आहे. पोलिसांच्या या कारवाईवरून जिल्हा रुग्णालयातील डॉक्‍टर, परिचारिका आणि अन्य कामगारांनी ‘काम बंद’ आंदोलन सुरू केले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पाटील यांनी ही माहिती दिली.

हेही वाचा: हिंसाचार वाढला तरी काश्‍मीर सोडणार नाही : संदीप मावा

पाटील म्हणाले, ‘‘या विभागात ज्यांची नियुक्‍ती होती, त्यांनी आपल्या नियुक्‍तीच्या ठिकाणी हजर राहणे आवश्‍यक होते. त्यांनी आपली जबाबदारी टाळली. हा निष्काळजीपणा सीसीटीव्ही फुटेजमध्ये रेकॉर्ड झाला आहे. या भक्कम पुराव्यांमुळेच चौघींना अटक केली आहे. इतर रुग्णांवर उपचार करीत असल्याचे सांगितले. मात्र, सर्वांच्या जबाबातही विसंगती आढळली.

अर्धा तास डॉक्टर नव्हता; कर्मचाऱ्यांचे चहापान

रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात आग लागल्यानंतर सुरवातीची १५ मिनिटे रुग्ण वगळता एकही डॉक्‍टर किंवा कर्मचारी या विभागात नव्हता. तब्बल २५ मिनिटांनी या विभागात नियुक्तीला असलेले डॉक्‍टर आणि परिचारिका आल्या. उशिराने आलेल्या कर्मचाऱ्यांनी आत जाऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला; पण नंतर कोणीही आत गेले नाही. काही कर्मचारी तर बाहेर चहा घेत होते.

loading image
go to top