Kashmir: हिंसाचार वाढला तरी काश्‍मीर सोडणार नाही : संदीप मावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संदीप मावा

हिंसाचार वाढला तरी काश्‍मीर सोडणार नाही : संदीप मावा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

श्रीनगर : पाकच्या चिथावणीने काश्मीरमधील हिंसाचारात वाढ झाली असली तसेच कुटुंबीयांचा विरोध असला तरी आपण श्रीनगर सोडणार नाही, असा निर्धार काश्मिरी पंडित समाजातील उद्योगपती संदीप मावा यांनी व्यक्त केला.

बोहरी कडाल परिसरात सोमवारी त्यांच्या दुकानाजवळ विक्रेता महंमद इब्राहिम खान याची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. प्रत्यक्षात मावा यांना मारण्यासाठी या हल्ल्याचा कट आखण्यात आला होता. गुप्तचर सूत्रांनी आधी खबर दिल्यामुळे मावा दुकानातून लवकर बाहेर पडले. त्यावेळी स्वतःची मोटार न वापरता त्यांनी दुसरे वाहन घेतले होते. ते गेल्यानंतर रात्री इब्राहिम हा मावा यांच्या मोटारीत बसत असताना हल्लेखोरांनी त्याच्यावर जवळून गोळ्या झाडल्या.

हेही वाचा: पेट्रोल-डिझेल वर चालणाऱ्या गाड्यांचे उत्पादन बंद करणार 'या' कंपन्या

मावा म्हणाले की, पोलिसांनी सावध केल्यामुळे मी दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारालाच दुकान सोडले. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास माझा बंधू इब्राहीम याला मारण्यात आले.

गेल्याच महिन्यात मावा यांच्या दुकानाजवळ काश्मिरी पंडित समाजातील औषधविक्रेते एम. एल. बिंद्रू यांना गोळ्या घालून मारण्यात आले होते. त्यानंतर हा प्रकार घडला. अलीकडच्या काही महिन्यांत अल्पसंख्य नागरिकांवरील हल्ल्यांचे प्रमाण वाढले असल्यामुळे त्यांनी येथे थांबू नये अशी कुटुंबीयांची इच्छा आहे.

यानंतरही आपण डगमगून गेलेलो नाही, असे स्पष्ट करून मावा यांनी काश्मीर सोडण्याचा प्रश्नच उद्धवत नाही असे ठामपणे स्पष्ट केले. इब्राहिमने १४ वर्षे आपल्या कुटुंबासाठी काम केले. हल्लेखोरांचे लक्ष्य आपणच होतो, पण ते ओळखण्यात चुकले. हा हल्ला अल्पसंख्य समाजावरच होता, असेही मावा म्हणाले.

गेल्या वर्षी शोपियाँ येथे राजौरीच्या तीन कामगारांना बनावट चकमकीत मारण्यात आले. याप्रकरणी मावा यांनी उच्च न्यायालयात याचिका सादर केली आहे. विशेष चौकशी पथक स्थापन करण्यात यावे अशी त्यांची मागणी आहे.

हेही वाचा: नवाबभाई वेल डन : मुख्यमंत्री ठाकरे

जम्मूतील उद्योगपती भाजपमध्ये दाखल

जम्मू, ता. १० (वृत्तसंस्था) ः काँग्रेसचे माजी नेते आणि प्रसिद्ध उद्योगपती वाय. व्ही. शर्मा यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्यामुळे आपण प्रभावित झालो आहोत. गेली तीन दशके पाक पुरस्कृत दहशतवादामुळे संवेदनशील बनलेल्या जम्मू-काश्मीरकडे त्यांनी पूर्ण लक्ष दिले आहे, असे शर्मा म्हणाले. जम्मू-काश्मीरमध्ये पक्षसंघटना भक्कम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. शर्मा जम्मू चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे माजी अध्यक्ष होते. गेल्या डिसेंबरमध्ये ते काँग्रेसमधून बाहर पडले. उद्योगपती हे संपत्तीची आणि रोजगार निर्मिती करतात. त्यामुळे पक्षाचे दरवाजे त्यांच्यासाठी सदैव खुले असले पाहिजेत. आपण पक्ष आणि उद्योग क्षेत्र यांच्यातील दुवा म्हणून काम करू, असेही शर्मा यांनी नमूद केले. पक्षाच्या येथील मुख्यालयात शर्मा आणि त्यांच्या समर्थकांचे प्रदेशाध्यक्ष रविंदर रैना आणि खासदार जुगल किशोर यांनी स्वागत केले.

मुस्लीम, हिंदू, ख्रिस्ती, शिख...

मावा यांचे कुटुंब २०१८ मध्येच काश्मीरमध्ये परतले. आता आपण परत जाणार नाही, असे स्पष्ट करून ते म्हणाले की, काश्मीरमध्ये मुस्लीम, हिंदू, ख्रिस्ती आणि शिख अशा सर्वच लोकांना मिळून दहशतवादाचा मुकाबला करावा लागेल. आपण पळून जाऊन चालणार नाही. दहशतवाद्यांना रान मोकळे सोडून चालणार नाही.जम्मू-काश्मीरमध्ये राज्य मानवी हक्क आयोग स्थापन करण्यात यावा अशी मागणीही मावा यांनी केली.

loading image
go to top