पार्किंग झोन म्हणजे काय असत?; नगरमधील बाजारपेठांतील अरुंद रस्त्यांवरच वाहने उभी

दत्ता इंगळे 
Tuesday, 10 November 2020

लॉकडाउन शिथिल होताच बाजारपेठा ग्राहकांनी भरल्या आहेत. महापालिकेच्या पार्किंगबाबतच्या फलकांनी माना टाकल्याने, वाहने कुठे उभी करावीत, असा प्रश्‍न अनेकांना पडतो.

अहमदनगर : शहरात लॉकडाउन शिथिल होताच बाजारपेठा ग्राहकांनी भरल्या आहेत. महापालिकेच्या पार्किंगबाबतच्या फलकांनी माना टाकल्याने, वाहने कुठे उभी करावीत, असा प्रश्‍न अनेकांना पडतो. परिणामी, ग्राहक शहरातील अरुंद रस्त्यांवरच वाहने उभी करून खरेदीचा आनंद लुटतात. मात्र, या वाहनांमुळे बाजारपेठांत वाहतुकीची प्रचंड कोंडी होते. 

हेही वाचा : पत्रव्यवहारावरून दावे- प्रतिदावे; नगर जिल्हा परिषदेने सुटीच्या दिवशी पाठविले वनविभागाला पत्र
तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे महापालिका आयुक्‍तपदाचा प्रभारी कार्यभार असताना, त्यांनी शहरात पार्किंगचे नियोजन केले होते. नंतर कोरोनामुळे लॉकडाउन सुरू झाले. महापालिकेलाही नवीन आयुक्‍त लाभले. लॉकडाउनमध्ये नागरिकांना रस्त्यावर येण्यास बंदी असल्याने, पार्किंगची समस्या भेडसावली नाही. मात्र, लॉकडाउनमधून आता शिथिलता दिली आहे. ग्राहक दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये येत आहेत. त्यामुळे वाहनांची वर्दळ वाढली आहे. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
महापालिकेच्या पार्किंगबाबतच्या फलकांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना पार्किंगसंदर्भात योग्य माहिती मिळत नाही. येथे एकेरी, दुहेरी वाहतूक, पी-1, पी-2, नो-पार्किंग, पार्किंग झोन, रस्त्यावरील दर्शक पट्टे कशासाठी असतात, हे जाणून घेण्याची तसदी नागरिक घेत नाहीत. शहरातील अरुंद रस्त्यांवर फेरीवाले व वाहने उभी राहिल्याने वाहतूक कोंडी वाढत जाते. कोरोनामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे असताना, बाजारपेठेतील गर्दी व वाहतूक कोंडी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे अनेक जण उपनगरांतच खरेदी करीत आहेत. शहरातील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शहर वाहतूक शाखेकडे पोलिस निरीक्षक नाहीत. महापालिकेनेही दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर अतिक्रमणे काढून रस्ते मोकळे करण्यासाठी मोहीम राबविलेली नाही. 

फेरीवालेही रस्त्यावर 
महापालिकेने दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्याची मोहीम अजूनही सुरू केलेली नाही. त्यामुळे फेरीवाल्यांनी रस्त्यांवरच आपली दुकाने थाटली आहेत. त्यामुळे वाहतुकीसाठी रस्ते आणखी अरुंद झाले आहेत. 

कोरोना प्रसाराची भीती 
बाजारपेठेत ग्राहकांची संख्या वाढू लागल्याने कोरोना संसर्गाची भीती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत अतिक्रमणे व रस्त्यांवरील वाहनांच्या पार्किंगमुळे बाजारपेठेत सोशल डिस्टन्सचा फज्जा उडत आहे.  

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagar news update Vehicles are parked on the narrow streets of the city markets