esakal | कारखान्यातील भ्रष्टाचार लपवण्यासाठीच नागवडेंची पळापळ, शेलार तुम्ही नेमके कोणत्या पक्षात?
sakal

बोलून बातमी शोधा

Nagwade changes parties only to hide factory corruption

नागवडे कारखान्याच्या पार्श्वभूमीवर नागवडे यांच्यावर आरोप सुरू झाले आहेत. ते कारखान्याचे खासगीकरण करण्याचा घाट घालीत असल्याचा आरोप होत आहे.

कारखान्यातील भ्रष्टाचार लपवण्यासाठीच नागवडेंची पळापळ, शेलार तुम्ही नेमके कोणत्या पक्षात?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

श्रीगोंदे : नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा तालुक्यात नेत्यांमध्ये सुंदोपसुंदी सुरू झाली आहे. 

""ज्येष्ठ नेते शिवाजीराव नागवडे यांनी कारखान्याची सत्ता सामान्यांसाठी वापरली. मात्र, त्यांचे पुत्र राजेंद्र नागवडे कारखान्याची सत्ता त्यांचा खासगी कारखाना वाढवून त्यातून स्वहित साधण्यासाठी वापरत आहेत. कारखान्यातील गैरव्यवहार झाकण्यासाठी कॉंग्रेस व भाजप असा सतत पक्षबदल करून ते "सेफ' होण्याचा प्रयत्न करीत आहेत,'' असा आरोप कारखान्याचे संचालक अण्णा शेलार यांनी केला. 

नागवडे कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत बोलताना शेलार म्हणाले, ""परभणीत राजेंद्र नागवडे यांचा खासगी साखर कारखाना आहे. येथील कामगार व साहित्य ते कायम त्या कारखान्यासाठी वापरतात. बापूंनी उभा केलेला हा सहकारी साखर कारखानाही खासगी करण्याचा डाव अध्यक्ष या नात्याने ते आखत आहेत. कारखान्यातील गैरव्यवहार बाहेर येऊ नयेत यासाठी ते, जो पक्ष सत्तेत येईल अथवा येण्याची शक्‍यता आहे, त्या पक्षात प्रवेश करतात. भाजप सत्तेवर येणार याची चाहूल लागताच त्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. नंतर महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर लगेच "कॉंग्रेस झिंदाबाद'चा प्रयत्न झाला. कारखाना निवडणुकीत हा सगळा गोंधळ सभासदांसमोर मांडणार आहोत.'' 
माजी उपाध्यक्ष जिजाबापू शिंदे, ऍड. बाळासाहेब काकडे, शांताराम भोईटे, ऍड. बापूसाहेब भोस आदी उपस्थित होते. 
निविदांची पाकिटे अध्यक्षांच्या घरी 
नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष केशव मगर म्हणाले, ""कारखान्याच्या कामाच्या निविदांची पाकिटे संचालक मंडळाऐवजी अध्यक्षांच्या घरी फोडली जातात. सगळेच "मॅनेज' करून सुरू आहे. सहवीजनिर्मिती प्रकल्पाचे काम अपूर्ण आहे; मात्र ठेकेदाराला सगळे पेमेंट अदा केले. इकडे कामगारांचे चार महिन्यांचे पगार थकले आहेत. आता विस्तारीकरणाच्या नावाखाली कर्ज काढून ते सभासदांना देत, त्यांचा कारभार कसा चांगला आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न होणार आहे.'' 

हेही वाचा - लॉकडाउनच्या भीतीने राहुरीत तरूणाची आत्महत्या

पक्ष बदलून तुम्हाला कशाची झाकापाक करायची होती? 
""नागवडे कारखान्याचा कारभार पारदर्शी आणि बापूंच्या विचारांवरच सुरू आहे. केवळ निवडणूक आली म्हणून विरोधकांचा पोटशूळ उठला आहे. माझ्या पक्षबदलावर चर्चा करणारे अण्णा शेलार हे नेमक्‍या कोणत्या पक्षात, कुणाच्या गटात आहेत, याचा शोध घ्यावा लागेल. त्यांनी अनेक वेळा पक्ष बदलले. त्यांना नेमके काय झाकायचे होते,'' असा प्रतिहल्ला नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी केला. 

शेलार यांच्या आरोपांबाबत "ई सकाळ'शी बोलताना नागवडे म्हणाले, ""कारखान्यात कुठलाही गैरव्यवहार नाही. जे आरोप करतात, तेही तेथे संचालक आहेत. त्यांनी संचालकांच्या बैठकीत एकदाही याबाबत साधी चर्चाही केली नाही. ज्यांना तेथील कारभार माहिती आहे, त्यांनी संचालकांच्या बैठकीत किमान चर्चा तरी करावी. मात्र, निवडणूक आली की बिनबुडाचे आणि प्रसिद्धीसाठी आरोप करायचे, ही त्यांची पद्धत आहे. मुळात माझ्यावर पक्षबदलाचा आरोप करणारे शेलार हेच नेमके कोणत्या पक्षात आहेत, हे त्यांनी सांगावे. ते तर रोज पक्ष बदलत असतात. त्या वेळी त्यांना काय बाहेर येऊ द्यायचे नसते, याचाही खुलासा करावा.'' 

कारखान्याचा कारभार कायमच बापूंच्या विचारांवर चालणार असल्याचे सांगत नागवडे म्हणाले, ""कारखान्याच्या सगळ्या निविदा ऑनलाइन होतात. त्यामुळे पाकिटे घरी फोडण्याचा आरोप हास्यास्पद आहे. माझ्याकडे कारखान्याचा कारभार येऊन एक वर्षच झाले आहे. कारखान्याच्या कारभारावर जे आरोप करीत आहेत, ते संचालक असल्याने त्यांनी याबाबत संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा करणे गरजेचे होते. मात्र, तसे झाले नाही. केवळ निवडणूक समोर ठेवून असे आरोप सुरू आहेत.''