वेगमर्यादा ओलांडली... एक कोटी 60 लाख 50 हजार रुपयांची दंड वसूली!

शांताराम जाधव
Friday, 27 November 2020

पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करणार्‍या बेशिस्त वाहन चालकांवर डोळासणे महामार्ग पोलिसांनी स्पीडगन मशीनद्वारे धडक कारवाई केली आहे.

बोटा (अहमदनगर) : पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करणार्‍या बेशिस्त वाहन चालकांवर डोळासणे महामार्ग पोलिसांनी स्पीडगन मशीनद्वारे धडक कारवाई केली आहे. ११ महिन्यांत तब्बल 20 हजार 175 वाहनांवर मोटार वाहन कायदा व त्यांचे नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई केली. एक कोटी 60 लाख 50 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

सदर कारवाईमध्ये 13 हजार 921 वाहनांवर अतिवेगाने वाहन चालविल्याने एक कोटी 39 लाख 21 रुपयांचा दंडासह 127 विना हेल्मेट दुचाकी स्वारांकडून 63 हजार 500 व वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणार्‍या 57 वाहन चालकांवर कारवाई करुन त्यांचेकडूनही 11 हजार 400 रूपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती डोळासणे महामार्ग पोलिस मदत केंद्राचे पोलिस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे यांनी दिली आहे. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
सतत वर्दळ असणार्‍या पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावरून ये- जा करताना वाहनचालकांनी वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याने दिवसेंदिवस छोट्या- मोठ्या अपघातांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. वाढत चालेलेल्या अपघातांच्या घटना रोखण्यासाठी डोळासणे महामार्ग पोलिसांना वाहनांवर कारवाई करण्यासाठी संबंधित विभागाकडून आत्याधुनिक स्पीडगन असलेली कार देण्यात आली आहे. ही कार महामार्गाच्याकडेला विशिष्ट अंतरावर उभी करुन महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या वाहनांची वेगमर्यादा तपासतात. अनुक्रमे कारसाठी 90, बस व ट्रकसाठी 80, तर दुचाकीसाठी ताशी 70 किलोमीटरची वेगमर्यादा ठरवून देण्यात आलेली आहे.

या नियमाचे उल्लंघन करणार्‍या वाहनांवर स्पीडगनद्वारे ऑनलाईन पद्धतीने दंड आकारला जात आहे. गेल्या अकरा महिन्यांत महामार्गावरुन धावणार्‍या लहान- मोठ्या अशा 20 हजार 175 वाहनांनी वेगमर्यादा ओलांडली असल्याने त्यांच्याकडून एक कोटी 60 लाख 50 हजार 200 रुपयांचा दंड वसूल केला आहे. अप्पर पोलिस महासंचालक (वाहतूक) डॉ. भूषणकुमार उपाध्याय, पुणे महामार्ग पोलिस विभागाचे अधीक्षक संजय जाधव आणि महामार्ग पोलिस विभाग अहमदनगर मंडल यांच्या सूचनांनुसार पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nashik Pune road speed A fine of Rs one crore