नगर महापालिकेत नापास भिडू झाले पास; आढाव, शेळके, शेटिया, कातोरे, आंधळे झाले स्वीकृत

अमित आवारी
Thursday, 1 October 2020

अहमदनगर महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी महापौरांनी आज महासभा बोलाविली होती. यात जिल्हाधिकारी आयुक्त असताना त्यांनी फेटाळलेल्या नावांचे अर्ज पुन्हा पटलावर मांडण्यात आले.

नगर : अहमदनगर महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी महापौरांनी आज महासभा बोलाविली होती. यात जिल्हाधिकारी आयुक्त असताना त्यांनी फेटाळलेल्या नावांचे अर्ज पुन्हा पटलावर मांडण्यात आले. त्या नावांना महापालिका आयुक्‍त श्रीकांत मायकलवार यांनी आज योग्य असल्याचे सांगितले.

त्यामुळे महापौर बाबासाहेब वाकळे यांनी या अर्जदारांना नगरसेवक म्हणून जाहीर केले. यात शिवसेनेकडून मदत आढाव व संग्राम शेळके, राष्ट्रवादीकडून विपूल शेटिया व राजू कातोरे तर भारतीय जनता पक्षाकडून रामदास आंधळे यांचा समावेश आहे.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक 
महापालिकेत 68 नगरसेवक आहेत. पाच स्वीकृत नगरसेवक घेता येतात. यात शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसला प्रत्येकी दोन, तर भाजपच्या वाट्याला एक जागा आली आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे महापालिकेच्या आयुक्‍तपदाचा भार असताना भाजपचे रामदास आंधळे, शिवसेनेचे संग्राम शेळके व मदन आढाव, तसेच राष्ट्रवादीचे (स्व.) बाबासाहेब गाडळकर व विपुल शेटिया यांच्या अर्जामध्ये त्रुटी दाखवून ते नाकारले होते. या मात्र, आज सादर झालेल्या नावांत (स्व.) बाबासाहेब गाडळकर वगळता मागच्या यादीतीलच अन्य नावे पुन्हा नव्या पाकिटातून सादर करण्यात आले. शिवसेनेच्या गटनेत्या रोहिणी शेंडगे यांनी मदन आढाव व संग्राम शेळके, राष्ट्रवादीचे गटनेते संपत बारस्कर यांनी माजी नगरसेवक विपूल शेटिया व राजू कातोरे तर भाजपच्या गटनेत्या उपमहापौर मालन ढोणे यांनी रामदास आंधळे यांचे अर्ज सादर केले होते.

या अर्जातील विपूल शेटिया, संग्राम शेळके व मदन आढाव यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. मात्र ते अजून सिद्ध झाले नसल्याचे सांगत आयुक्‍त मायकलवार यांनी अर्ज मंजूर केले. मदन आढाव यांनी महापालिकेतील तत्कालीन शहर अभियंता विलास सोनटक्‍के यांच्यावर बुट फेकला होता. या संदर्भात महापालिकेतील सर्व अभियंत्यांनी एकत्र येत काम बंद आंदोलन केले होते. तसेच सोनटक्‍के यांनी आढाव यांच्या विरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी आढाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून घेतला होता. हे बुटफेक प्रकरण महापालिकेत चांगलेच गाजले होते. या प्रकरणावरून महापालिकेचे वातावरण तापले होते. त्याच महापालिकेत आढाव आता नगरसेवक म्हणून दिसणार आहेत.

हे आहेत "स्वीकृत'
शिवसेना -
मदन आढाव, संग्राम शेळके
राष्ट्रवादी कॉंग्रेस - विपूल शेटिया, राजू कातोरे
भाजप - रामदास आंधळे

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP and Shivsena sanctioned corporator in the Municipal Corporation