बेकायदा वाळूउपसा बंद करण्यासाठी श्रींगोद्यात राष्ट्रवादी उतरणार रस्त्यावर

संजय आ. काटे
Thursday, 1 October 2020

म्हसे, राजापूरसह अन्य गावांतील घोड नदीपात्रातून बेकायदा वाळूउपसा सुरू आहे. 

श्रीगोंदे (अहमदनगर) : तालुक्‍यातील म्हसे, राजापूरसह अन्य गावांतील घोड नदीपात्रातून बेकायदा वाळूउपसा सुरू आहे. त्याला प्रशासनाचे पाठबळ असून, वाळूउपसा न थांबल्यास श्रीगोंदे तहसील कार्यालय व बेलवंडी पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्याच्या निषेधासाठी आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवक नेते अतुल लोखंडे यांनी दिला आहे. 

हेही वाचा : आता "रुग्ण पाठवा ना रुग्ण' अशी स्थिती... 
लोखंडे यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे, की सध्या कोरोना महामारीचे संकट असताना वाळूमाफिया या संधीची चांदी करीत आहेत. माठ, म्हसे व परिसरातील गावांतून प्रचंड प्रमाणात अवैध वाळूउपसा करीत आहेत. अंदाजे 30 ते 35 हैड्रॉलिक बोटींच्या माध्यमातून हा उपसा होत असून, रोज 100 ते 150 ट्रकद्वारे वाळूची अवैधरीत्या वाहतूक होत आहे. या अवजड वाहतुकीमुळे या दोन गावांबरोबरच शेजारील राजापूर, हिंगणी, पिंपरी कोलंदर, ढवळगाव, देवदैठण, बेलवंडी फाटा आदी रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडून त्यांची दुर्दशा झाली आहे. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
यासाठी काही टोळ्या तयार झाल्या असून, त्या स्वतःची मक्तेदरी असल्याप्रमाणे प्रत्येक वाहनचालकाकडून तीन ते पाच हजारांप्रमाणे रोज अवैध रक्कम गोळा करतात. या सर्व कामकाजासाठी या दोन्ही गावांत बाहेरगावची जवळपास 50 मुले नेमली असून, त्यांच्या माध्यमातून अवैध वसुली केली जाते. यासाठी स्थानिक तरुणांचेही सहकार्य लाभत असल्याने, परिसरातील बहुतांश गावांतील तरुण पिढी व्यसनाधीन व गुंड प्रवृत्तीची बनली आहे. वाळूमाफिया स्थानिक तरुणांसह जमावाने फिरत असल्याने, या दोन्ही गावांसह परिसरातील सुजाण नागरिक प्रचंड दहशतीखाली आहेत. 

शेजारील शिरूर (जि. पुणे) येथील महिला तहसीलदारांना याची जाणीव होताच त्यांनी आपली हद्द सोडून अगदी बेधडकपणे या भागात येऊन कारवाई केली. मात्र, तालुक्‍यातील महसूल व पोलिस प्रशासन बघ्याची भूमिका घेताना दिसत आहे. त्यामुळे महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी श्रीगोंदे तहसील कार्यालय व बेलवंडी पोलिस ठाण्यात गांधीगिरी करून अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP demands to stop sand extraction in Shrigonda taluka