
स्थायी समिती सभापतिपदासाठी आमदार संग्राम जगताप यांनी अविनाश घुले यांच्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.
नगर: महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने एकजुटीने भाजपला रोखून धरले आहे. विशेषतः राष्ट्रवादी आणि शिवसेनेने मिळून ही चळवळ सुरू केली आहे. मात्र, नगरमध्ये त्यांचे विळ्या-भोपळ्यांचे सख्य आहे.
शिवसेनेचे माजी आमदार कै. अनिल राठोड आणि राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार संग्राम जगताप यांचे कधीच जमले नाही. राज्यात सरकार आल्यानंतरही दोघांची दोन दिशेला तोंडं होती.
शिवसेनेला बाजूला ठेवण्यासाठी त्यांनी रणनीती आखली आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा अर्ज भरताना भाजपचे महापौर उपस्थित होते. महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक अविनाश घुले यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. अर्ज दाखल करण्याचा आज (बुधवार) शेवटचा दिवस आहे.
हेही वाचा - षटकाराच्या बादशहाची अपघाताने घेतली विकेट
स्थायी समिती सभापतिपदासाठी आमदार संग्राम जगताप यांनी अविनाश घुले यांच्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी घुले यांनी दोन मिनिटांच्या अंतराने दोन अर्ज दाखल केले. पहिल्या अर्जाला बसपचे नगरसेवक मुदस्सर शेख हे सूचक, तर राष्ट्रवादीचे नगरसेवक प्रकाश भागानगरे हे अनुमोदक आहेत.
दुसऱ्या अर्जाला राष्ट्रवादीचे नगरसेवक डॉ. सागर बोरुडे हे सूचक, तर कॉंग्रेसच्या सुप्रिया जाधव या अनुमोदक आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करताना महापौर बाबासाहेब वाकळे, विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, राष्ट्रवादीचे गणेश भोसले, भाजपचे मनोज दुल्लम, रामदास आंधळे, रवींद्र बारस्कर, कॉंग्रेसचे धनंजय जाधव, निखिल वारे, बाळासाहेब पवार आदी उपस्थित होते.
बिनविरोधसाठीही प्रयत्न
घुले यांच्या अर्जामुळे राष्ट्रवादीने आपला उमेदवार स्पष्ट केला आहे. आमदार जगताप ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यासाठी त्यांनी भाजपचे नेते व शिवसेनेच्या मुंबईतील वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. आमदार जगताप यांचे हे प्रयत्न किती सफल होतात, हे उद्या (बुधवारी) समोर येणार आहे. पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या उपस्थितीत गुरुवारी (ता. 4) निवडणूक प्रक्रिया होईल.