संगमनेरातील मानवसेवा, शिक्षण केंद्र शतकोत्सवासमीप

आनंद गायकवाड
Friday, 18 December 2020

दिनदलितांना अत्याचार, अमानवी वागणूक, भेदाभेद करणाऱ्या धर्मापेक्षा माया व समानतेची वागणूक देणारा ख्रिस्ती धर्म आपलासा वाटू लागला होता. या काळात प्रार्थनेसाठी राज्यात अनेक ठिकाणी चर्च उभारली गेली.

संगमनेर ः स्वातंत्र्यपूर्व काळापासून अनेक धर्मगुरुंनी धार्मिक उपदेश करताना समर्पित भावनेतून सेवा करुन अनेकांना विचारांची व जगण्याची दिशा दिली. त्या पवित्र वास्तूला 94 वर्षे पूर्ण झाली आहेत. या वास्तूचे पावित्र्य राखणे चर्चच्या दृष्टीने महत्वाचा ठेवा असल्याचे प्रतिपादन संदेशकार हर्शल पवार यांनी केले.

संगमनेर खुर्द येथील मेथॉडिस्ट चर्चच्या 94 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या धार्मिक उपक्रमात ते बोलत होते.

संगमनेर खुर्द येथील प्रवरा नदीकाठी स्वातंत्र्यपूर्व काळात बांधलेल्या मेथॉडिस्ट चर्चला 15 डिसेंबर रोजी 94 वर्ष पूर्ण झाली आहेत. भारतात आलेल्या ख्रिस्ती धर्मगुरुंनी त्यांचे देशी अनुयायी तयार करण्यास सुरवात केली होती.

दिनदलितांना अत्याचार, अमानवी वागणूक, भेदाभेद करणाऱ्या धर्मापेक्षा माया व समानतेची वागणूक देणारा ख्रिस्ती धर्म आपलासा वाटू लागला होता. या काळात प्रार्थनेसाठी राज्यात अनेक ठिकाणी चर्च उभारली गेली.

संगमनेर खुर्द येथे प्रवराकाठच्या चार एकर प्रशस्त जागेत प्रोटेस्टंट पंथातील मेथॉडिस्ट मिशनचे संस्थापक धर्मगुरु सॅम्युअल राहाटोर यांच्या हस्ते 6 ऑक्टोबर 1927 रोजी पायाभरणी झाली. त्यानंतर केवळ दिड महिन्यात चुना, दगड व विटांमधून क्वीन्स स्ट्रक्चर या वैशिष्ट्यपूर्ण लाकडी वाशांच्या स्थापत्यशैलीवर पत्र्याचे छत असलेली इमारत साकारण्यात आली.

हेही वाचा - कर्जत-जामखेडच्या पोलिसांना अनोखे गिफ्ट

आतील प्रार्थना वेदी, बाके, खांब, तुळया सारे ब्रिटीश काळाची आठवण करुन देते. या चर्चचे लोकार्पण रेव्हरंड ए. जे. रेव्हनल यांच्या धार्मिक प्रार्थनेच्या घोषात 15 डिसेंबर 1927 रोजी झाले. या ठिकाणी आलेल्या धर्मगुरुंनी रंजल्या-गांजल्यांची सेवा करुन त्यांना शिक्षण व विकासाच्या प्रवाहात आणून राष्ट्रबांधणीत योगदान दिले आहे. 

वर्धापन दिनानिमित्त स्तुती गीते, प्रार्थना, व शास्त्र वाचनातून प्रभुचा संदेश देत विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आल्याची माहिती धर्मगुरु विकास संगमे यांनी दिली.

या प्रसंगी प्रा.बाबा खरात, राजस जाधव, ताराबाई सांगळे, विजय खंडीझोड, डॉ. हेमलता राठोड, प्रतिभा रोहम आदींसह मोठ्या संख्येने अनुयायी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सत्यानंद कसाब, प्रविण रोहम, बाबासाहेब घोडके, विलास जाधव, प्रांजल राठोड आदींनी परिश्रम घेतले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Near the centenary of the Methodist Church at Sangamnera