esakal | बाहेरील व्यक्ती घेतात कर्मचाऱ्यांच्या खुर्चीचा ताबा! जिल्हा परिषदेतील हा प्रकार नित्याचाच
sakal

बोलून बातमी शोधा

ahmednagar zp

इथे बाहेरील व्यक्ती घेतात कर्मचाऱ्यांच्या खुर्चीचा ताबा!

sakal_logo
By
दौलत झावरे

अहमदनगर : जिल्हा परिषदेतील एक-दोन विभागांतील काही कर्मचाऱ्यांची बाहेरील व्यक्तींबरोबर असलेल्या सलगीमुळे संबंधित व्यक्ती कार्यालयात आल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या खुर्चीचा ताबा घेऊन त्यांच्याशी संबंधित असलेल्या फायलींची पडताळणी करून त्या वरिष्ठांपर्यंत घेऊन जाण्याचा प्रकार जिल्हा परिषदेत नित्याचाच झाला आहे. याबाबत काही कर्मचाऱ्यांकडून तक्रारी करण्यात येत असल्या, तरी हा प्रकार सध्या सुरूच आहे. (Neglect-of-administration-in-Zilla-Parishad-marathi-news-jpd93)

जिल्हा परिषदेतील हा प्रकार नित्याचाच; प्रशासनाची डोळेझाक

जिल्हा परिषदेतील त्या विभागाच्या कारभाराची प्रकरणे नेहमीच चव्हाट्यावर आली असून, त्यावर सर्वसाधारण सभेतही अनेकदा वादळी चर्चा झाली आहे. मात्र, अद्यापही त्या विभागाच्या कारभारात सुधारणा झालेली नाही. याच विभागातील काही फायली जिल्हा परिषदेच्या एका पदाधिकाऱ्यासमोर बाहेरील व्यक्ती स्वाक्षरी घेऊन गेल्याची घटनाही दोन वर्षांपूर्वी घडली होती. त्यावरून संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची झाडाझडती घेण्यात आली होती. त्यावरूनही सर्वसाधारण सभेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती झाली होती. त्यानंतर कारभारात सुधारणा होईल, अशी आशा होती. मात्र, अद्यापही बाहेरील व्यक्ती कार्यालयात येऊन, आपल्या फाइलची पडताळणी स्वतः करून ती एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर घेऊन जाण्याचे प्रकार करीत आहेत. विशेष म्हणजे कर्मचारीही फाइल नेण्यास परवानगी देत आहेत, अशी चर्चा सध्या जिल्हा परिषदेत आहे. यामध्ये बाहेरील व्यक्ती थेट कर्मचाऱ्यांच्या टेबलचे कपाट उघडून फायलींची शोधाशोध करून त्या घेऊन, कर्मचाऱ्यांच्या खुर्च्यांवर बसून त्यांची तपासणी करून त्या दुसऱ्या टेबलवर घेऊन जात आहेत. हे सर्व प्रकार जिल्हा परिषदेतील त्या दोन विभागांमध्ये नेहमीच घडत आहेत.

बाहेरील व्यक्तीच्या हातात कार्यालयातील कामकाजाच्या फायली दिसून आल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. त्यानंतर संबंधित विभागाच्या प्रमुखांकडून खुलासा मागविण्यात येईल. - वासुदेव सोळंके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग

अधिकाऱ्यांच्या दालनात फायलींची तपासणी

अधिकाऱ्यांच्या दालनात जाऊनही अनेकदा फायलींची उचकापाचक होत असते. हा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सरू आहे. याला पायबंद घालणे गरजेचे आहे, अशी चर्चा सध्या जिल्हा परिषदेच्या वर्तुळात सुरू आहे.

हेही वाचा: सुखी संसाराला जुन्या प्रेमाचे ग्रहण! माहेर-सासरचे दरवाजे बंद

हेही वाचा: संपलेलो नाही; ‘झेडपी’सह विधानसभाही लढू!

loading image