
पोलिसांनी या गुन्ह्यातील ट्रकसह सुमारे साडेआठ लाख रुपयांचा कापूस जप्त केला. नेवासे पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नेवासे : नऊ लाख रुपये किंमतीच्या कापसाची फरवणूक करणाऱ्या तिघांना नेवासे पोलिसांनी थेट गुजरातमध्ये जाऊन अटक केली. पोलिसांनी या गुन्ह्यातील ट्रकसह सुमारे साडेआठ लाख रुपयांचा कापूस जप्त केला. नेवासे पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कापूस व्यापारी संदेश शरदलाल फिरोदिया (रा. प्रवरसंगम, ता. नेवासे) यांनी (ता. 9) नोव्हेंबर रोजी नेवासे पोलिसांत नऊ लाख तेरा हजार 260 रुपये किंमतीचा कापूस ट्रक ( GJ - 11 VV - 8805 ) मध्ये भरुन पटेल कॉटन इंडस्ट्रीज, हळवद रोड धागद्रा जि. सुरेंद्रनगर येथे नेवून खाली करणे अपेक्षित होते.
हेही वाचा - इंदोरीकरांना कोर्टाची पुढची तारीख
तसे न करता आरोपींनी परस्पर विल्हेवाट लावून फसवणूक केल्याबद्दल नेवासे पोलिसांत तक्रार दिली होती. दरम्यान सदर गुन्ह्याचा तपास हा गुजरात राज्यात असलेने उप विभागीय पोलीस अधीक्षक सुदर्शन मुंडे, नेवासे पोलीस ठाण्याचे प्रभारी परिविक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षक अभिनव त्यागी यांच्या मार्गदर्शनाखाली नेवाशाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुर, पोलिस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे, पोलीस नाईक राहुल यादव, महेश कचे, अशोक कुदळे, वसीम इनामदार यांच्या पथकाने जामनगर (गुजरात) येथे नगर गुन्हे शाखेच्या तांत्रिक मदतीने तपास लावून जामनगर येथून कान्हा उर्फ देवल दिनेशभाई डाभी (वय 25, रा गोकुळधाम सोसायटी, दरेड ता. जि - जामनगर) बंदिया राम सोमात (वय 23, धंदा गाडी व्यापार रा. सेल नं 04 आर्शिवाद सोसायटी , रणजीत सागर रोड , ता.जि जामनगर) व भरतभाई आंबाभाई मांगुकिया (वय 48, रा - न्यु कतारगाव , वरीयाव रोड , प्रमुख एव्हेन्यु सी-बिल्डींग रुम नं 202 जि. सुरत) या तीन आरोपींना अटक करून त्यांच्याकडुन गुन्ह्यात वापरलेली ट्रक तसेच बेंडवान ता. डेडीयापाडा जि. नर्मदा, गुजरात येथुन गुन्ह्यातील 8 लाख 48 हजार रुपये किंमतीचा कापुस जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान आरोपींना नेवासे येथील न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना (ता. 21) डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास प्रभारी पोलीस अधिकारी अभिनव त्यागी व पोलीस कॉन्स्टेबल अशोक कुदळे हे करीत आहेत.
आरोपींवर जळगाव जिल्ह्यातही गुन्हा!
नेवासे पोलिसांनी थेट गुजरात राज्यात कारवाईत अटक केलेल्या आरोपींवर धरणगाव पोलीस ठाणे, जि.जळगाव येथे भादंवी कलम 407, 34 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. नेवासे पोलीसांमुळे आता जळगाव पोलिसांना आरोपी आयतेच मिळाले असून नेवासे येथील तापास संपल्यावर यासर्व आरोपींना जळगाव पोलिस ताब्यात घेणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.