आठवडेबाजारात भेळ खाताना हाती आला "सोन्याचा" कागद...मग आयुष्याचंही झालं सोनं

शांताराम काळे
Friday, 17 July 2020

म्हणाल तर एक कागदाचा तुकडा... पण त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी मिळाली की आयुष्य कस बदलून जातं,याचे जीवंत उदाहरण म्हणजे रघु अर्थात रघुनाथ सोनवणे! आठवडी बाजारात भेळ खाताना हाती कागद आला नि त्या कागदामुळेच त्याने दिल्ली पाादाक्रांत केली.

अकोले (अहमदनगर) : वर्तमानपत्राची रद्दी, भंगार म्हणून ते अडगळीला फेकून दिलं तर आपलंही आयुष्य अडगळ बनू शकतं... हे कोणत्या कादंबरीतील किंवा प्रेरणादायी वक्त्याच्या तोंडचं वाक्य नाही. परंतु असं म्हणतात नजर बदलली तर नजरिया बदलेल. अकोल्यातील एका तरूणाच्या हाती भेळ खाताना आलेल्या कागदाने त्याच्या आयुष्याचंच सोनं केलं. 

त्याच्या घरची परिस्थिती बेताचीच! दोन वेळच्या जेवणाची ही भ्रांत. अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले येथील बुवासाहेब नवले पतसंस्थेत नोकरी करणारा रघु असाच एका संध्याकाळी आठवडी बाजारात 'हरी ओम भेळी'च्या हातगाडीवर गेला. त्याने भेळ घेतली. पण त्याला काय माहिती होते की ही भेळ त्याला थेट देशाच्या राजधानीत घेवून जाईल.

हेही वाचा - एकाच व्यक्तीचे दोन रिपोर्ट ः एक पॉझिटिव्ह, एक निगेटिव्ह

वृत्तपत्राच्या कागदावर भेळ खात असताना रघुच्या नजरेस एक सरकारी जाहिरात पडली. महाराष्ट्र सरकारच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिल्ली स्थित महाराष्ट्र परिचय केंद्र या कार्यालयात नोकर भरतीची ती जाहिरात बघून रघु खूश झाला.

'उजडले भाग्य आता' अशीच काही अवस्था त्याची झाली. त्याने पात्रतेनुसार लिपिक टंकलेखक पदासाठी अर्ज केला. लेखी परीक्षा व मुलाखतीत उत्तम यश मिळवत त्याने या कार्यालयात आपले स्थान निश्चित केले. हाच शासकीय नोकरीतील त्याचा प्रवेश ठरला.

दिल्ली हे शहर भल्या भल्यांना मानवत नाही. त्याला कारणे ही बरीच आहेत. ठळक कारणांमध्ये येथील विषम हवामान म्हणजे हिवाळ्यात टोकाची थंडी व उन्हाळ्यात टोकाचा उकाडा. बोल- चालीची भाषा हिंदी व देशाच्या राजकारणाची सुत्रच या शहरातून हलतात.

या शहरातील लोकांमध्येही राजकारणाचे रंग भिनलेले अशा एकानेक प्रतिकुल परिस्थतीला तोंड देत रघुने आपलं प्रेमळ मन व माणुसकी साबुत ठेवत नोकरीतही यशस्वी प्रवास केला. लिपिक टंक लेखक पदावरून, वरिष्ठ लिपिक व आता थेट याच कार्यालयातील तिजोरीच्या चाव्या ज्याच्या हातात आहेत, असा लेखापाल म्हणून रघु हे जबाबदारी सांभाळत आहेत.

आपल्या कामा व्यतिरीक्त जनसंपर्क विभागात तो कामाला आहे. त्यातील प्रभावी जनसंपर्काचे गुण त्याने आत्मसात केले आहे. म्हणूनच नगरसह महाराष्ट्रातून दिल्लीत कामा निमित्त रघुच्या संपर्कात येणारा प्रत्येक व्यक्ती कायम त्याच्याशी जोडला जातो.

एकंदरीत भेळीसोबत आलेला तो केवळ वर्तमानपत्राचा कागदाचा तुकडा नव्हता तर तो सोन्याचा कागद होता, असे रघु मानतो. कारण याच कागदाने त्याचं आयुष्य सोन्याचं बनवलं आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Newspaper advertising changed his life