जेईई व नीट परीक्षा पुढे ढकलावी; विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता

आनंद गायकवाड
Friday, 28 August 2020

देशासह राज्यात कोरोनाच्या महामारीचे संकट सुरु आहे. या संवेदनशील कालावधीत केंद्र सरकारने 6 व 13 सप्टेंबरला जेईई व नीट या प्रवेश परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.

संगमनेर (अहमदनगर) : देशासह राज्यात कोरोनाच्या महामारीचे संकट सुरु आहे. या संवेदनशील कालावधीत केंद्र सरकारने 6 व 13 सप्टेंबरला जेईई व नीट या प्रवेश परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी अहमदनगर एनएसयुआयच्या वतीने करण्यात आली आहे. 

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरचे उपविभागीय अधिकारी डॉ. शशीकांत मंगळूरे यांना विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने याबाबत निवेदन देण्यात आले. 

या निवेदनात म्हटले आहे, सध्या संपूर्ण जग कोरोना या वैश्विक संकटामुळे त्रस्त आहे. भारतात हे संकट अधिकच भीषण बनले आहे. सद्यस्थितीत भारतात कोरोना रुग्णांची संख्या तीस लाखांहून अधिक झालेली आहे. अश्या परिस्थितीत अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यावश्यक असणार्‍या जेईई व नीट या परीक्षा 6 व 13 सप्टेंबर रोजी घेण्याचा घाट केंद्र सरकारने घातला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतायुक्त भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अशा परिस्थितीत परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात घालणे कितपत योग्य आहे असा सवाल एनएसयुआयच्या वतीने करण्यात आला आहे. या परीक्षा पुढे न ढकलल्यास एनएसयुआयच्या वतीने आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

यावेळी एनएसयुआयचे जिल्हाअध्यक्ष निखील पापडेजा, तालुकाध्यक्ष गौरव डोंगरे, तालुका उपाध्यक्ष शेखर सोसे, शहर उपाध्यक्ष निखील पवार, शहर उपाध्यक्ष हैदरअली सय्यद, महासचिव रोहित बनकर, सिद्धेश घाडगे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NSUI students union demands postponement of JEE and Neat exams