देश-विदेशातील साडेतिनशे सासुरवासीनींचे ऑनलाईन संमेलन व धोंडे भोजन

आनंद गायकवाड
Tuesday, 13 October 2020

अधिक मासात सासरी नांदणाऱ्या लेक जावयाला धोंडे भोजन घालण्याची प्राचीन परंपरा अद्यापही टिकून आहे.

संगमनेर (अहमदनगर) : अधिक मासात सासरी नांदणाऱ्या लेक जावयाला धोंडे भोजन घालण्याची प्राचीन परंपरा अद्यापही टिकून आहे. मात्र या वर्षी कोरोनाच्या सावटामुळे इच्छा असूनही ही परंपरा न पाळता येणाऱ्यांसाठी संगमनेरातील माहेश्वरी ज्युनिअर महिला मंडळाने देश, विदेशातील माहेश्‍वरी समाजातील साडेतिनशे महिलांचे ‘ऑनलाईन’ संमेलन व ऑनलाईन धोंडे भोजनाचा अभिनव उपक्रम राबविला. 

पुण्यकर्मासाठी प्रसिध्द असलेल्या अधिकमासात कोरोनाच्या संसर्गजन्य महामारीमुळे अनेक निर्बंध लागू आहेत. प्रवासासह अन्य कार्यक्रमांवरही मर्यादा आहेत. प्रत्येक तीन वर्षांनी येणार्‍या या पुरुषोत्तम मासात सासरी नांदणार्‍या लेकीला जावयासह माहेरी बोलावून त्यांना सन्मानाने धोंडे खाऊ घालण्याची प्राचीन प्रथा आहे. 

यंदा मात्र यावरही गदा आली होती. यावर मार्ग काढण्यासाठी माहेश्‍वरी ज्युनिअर महिला मंडळाच्या अध्यक्ष अनुराधा मालपाणी यांच्या संकल्पनेतून या बाई-बेटी संमेलनाचे आयोजन केले गेले. तीन दिवस चाललेल्या या संमेलनाचे उद्घाटन सिनेअभिनेत्री मृणाल देव-कुलकर्णी यांनी केली. या प्रसंगी डॉ. संजय मालपाणी यांनी आपल्या खुमासदार भाषणाने उद्घाटन कार्यक्रमात रंगत आणली. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
आदिती लाहोटी हीच्या गणेशवंदना नृत्याने कार्यक्रमाची सुरवात झाली. यावेळी संगमनेरातील प्रसिद्ध स्थळांचे दर्शन व्हीडीओतून करण्यात आले. संगमनेरातील देश विदेशात असलेल्या सुमरे 350 विवाहीत महिलांना ऑनलाईन संमेलनासाठी आमंत्रित केले. या माध्यमातून सर्व सासुरवासीनिंनी माहेरचा आभासी अनुभव घेतल्याने त्यांच्या चेहर्‍यावर हास्य आणि समाधानाची लकेर उमटली. या संमेलनात फॅन्सी ड्रेस, संगमनेर प्रश्‍नमंच, नृत्य स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच स्किन व हेअर केअर, हास्य योग या जिव्हाळ्याच्या विषयांवर प्रशिक्षण वर्गांचेही आयोजन करण्यात आले. अनेक महिलांनी संगमनेरच्या आठवणींना उजाळा दिला.

प्रकल्प प्रमुख सोनाली नावंदर व रक्षा बूब यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी सरला आसावा, स्मीता मालाणी, सारिका मणियार, वैशाली पोफळे, पूजा कासट यांच्या समवेत कार्यकारी मंडळाच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online festival of Maheshwari Junior Mahila Mandal at Sangamner