
कोरोनाच्या सावटातून सावरत असतानाच नगर व सोलापूर जिल्ह्यात बिबट्याने धुमाकुळ घातला आहे. बीड व अहमदनगर जिल्ह्यात हल्ले करुन बिबट्याने सोलापूर जिल्ह्याकडे मोर्चा वळवला आहे.
अहमदनगर : कोरोनाच्या सावटातून सावरत असतानाच नगर व सोलापूर जिल्ह्यात बिबट्याने धुमाकुळ घातला आहे. बीड व अहमदनगर जिल्ह्यात हल्ले करुन बिबट्याने सोलापूर जिल्ह्याकडे मोर्चा वळवला आहे. १६ नोव्हेंबरपासून या बिबट्याने नऊ जणांचा बळी घेतला आहे. करमाळा तालुक्यात पाच दिवसात तिघांचा बळी घेतला आहे. या बिबट्याला आता ठार मारण्याचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा : एक होती अवनी... शूटआउटला एक वर्ष पूर्ण
महाराष्ट्रात यापूर्वी नगर जिल्ह्यात बिबट्याला ठार मारण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, त्यात बिबट्याला पकडण्यात आले होते. तर यवतमाळ जिल्ह्यात १३ जणांचे बळी घेतल्यानंतर अवनी या वाघिणीला ठार मारण्यात आले होते. बिबट्याने 16 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर २०२० या काळात बीड, नगर व सोलापूर जिल्ह्यात नऊजणांचा बळी घेतला. याशिवाय तिघांना गंभीर जखमी केले. नरभक्षक बिबट्या घातक ठरू लागल्याने सर्वस्तरातून त्याला ठार मारण्याची मागणी झाली. त्याची दखल वनविभागाने घेतली आहे. राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर यांनी त्याला पिंजरा लावून तथा बेशुध्द करुन पकडणे शक्य नसल्यास गोळ्या घालून ठार करण्याची परवानगी दिली आहे. त्यानंतर करमाळा तालुक्यात यंत्रणा कामाला लागली आहे.
नरभक्षक बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी व शेतमजुरांसह उसतोड कामगारांना शेतात जाणे मुश्किल केले आहे. करमाळा तालुक्यात तहसीलदार समीर माने, पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांच्यासह वनविभागाची यंत्रणा कमीत कमी जीवीतहानी व्हावी म्हणून कामाला लागली आहे.
हेही वाचा : नऊ जणांचा खत्मा करणाऱ्या बिबट्याला ठार मारण्याचे आदेश; करमाळ्यात सहा दिवसता तीन बळी
नरभक्षक बिबट्याने घेतले बळी...
सोलापूरमधील पत्रकार तात्या लांडगे म्हणाले, बिबट्याच्या हल्ल्यात अल्का बडे (रा. जाटवाद, ता. शिरुर), शिलावती दिंडे (रा. मंगळूर, ता. आष्टी) व शिलाबाई भोसले (रा. पारगाव, ता. आष्टी) या गंभीर जखमी झाल्या आहेत. तर अशोक आवटे, कृष्णा आवटे (रा. आपेगाव, गोदावरी नदीकाठी उत्तरेस), छबुबाई राठोड (रा. भगवानगड तांडा, ता. पाथर्डी), नागनाथ गर्जे (रा. सुर्डी, ता. आष्टी), स्वराज भापकर (रा. किन्ही, ता. आष्टी), सुरेखा भोसले (रा. रा. पारगाव, ता. आष्टी), कल्याण फुंदे (रा. लिंबेवाडी, ता. करमाळा), जयश्री शिंदे (रा. अंजनडोह, ता. करमाळा) व फुलाबाई हरिचंद कोठले (उसतोड कामगाराची मुलगी) यांचा बळी घेतला आहे. दरम्यान, बिबट्याला ठार करण्यासाठी पुणे व औरंगाबाद प्रादेशिक वन विभागीय कार्यालयाने प्राधिकृत केलेले वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, पोलिस कर्मचारी तथा अन्य व्यक्तींनाच परवानगी दिली आहे.
बिबट्याची सवयी व तंत्र बदलले
सेवानिवृत्त विभागीय वन अधिकारी अशोक फटांगरे म्हणाले, नगर जिल्ह्यात २००८- ०९ मध्ये अकोले तालुक्यातील बिबट्यांनी एकदरे, सांगवी, वीरगाव व केळी परिसरात बिबट्याने छोट्या मुलांना उचलून नेले होते. त्यावेळी त्यांना नागपूरवरून शूट करण्याचे आदेश आले. मात्र आम्ही त्या बिबट्याला पिंजरात पकडले. त्यावेळी पाच बिबटे आम्ही पकडले होते. ऊसाचे क्षेत्र वाढल्याने हे बिबटे २०० किलोमीटर सरकले होते. पूर्वी बिबट्यांचा वावर आदिवासी पट्ट्यात अधिक होता आता हे प्रमाण ऊस क्षेत्रत वाढले असून आदिवासी भागात बिबटे नगण्य आहे. बिबट्याच्या सवयी व शिकारीचे तंत्र ही बदलले आहे.
अवनीने घेतले होते १३ बळी
यवतमाळ येथील पत्रकार सुरज पाटील म्हणाले, राळेगाव तालुक्यात वनक्षेत्रात मुक्त वावर करून अवनी वाघीणीने 13 जणांचे बळी घेतले होते. या घटनेला दोन वर्ष झाले. यामध्ये शेतकरी, शेतमजूरांचे बळी गेले होते. त्यामुळे नागरिकांच्या मनात भिती निर्माण झाली होती. तिचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जाऊ लागली. मात्र, तिला ठार मारण्यास विरोध केला होता. मात्र, 2 नोव्हेंबर २०१९ ला तिला ठार करण्यात आले. शार्पशूटर नवाब अली व त्यांचा मुलगा असगर अली यांनी मिशन फत्ते केले होते. त्यानंतर २० गावातील नागरिकांनी मोकळा श्वास घेतला होता. मात्र शार्पशुटरच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला. अवनीला पकडण्यासाठक्ष वनविभागाने विविध प्रकारची रणनीती आखली होती. यासाठी 200 जणांचा फौजफाटा घेऊन मिशन हाती घेण्यात आले होते. यात देशपातळीवरील शार्पशूटर, डबल बॅरल बंदूक, नाईट दुर्बिणी, ड्रोन कॅमेरे आदी लवाजमा होता.
अकोले तालुक्यातही अशीच घटना पण...
नगर जिल्ह्यातील अकोलेमधील पत्रकार शांताराम काळे म्हणाले, अकोले तालुक्यात दहा वर्षापूर्वी एका नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश दिले होते. त्याने सांगवी, बिरगाव, एकदरी येथे धुमाकुळ घातला होता. त्याने तीन मुले, दोन गाई, १० शेळ्यांवर हल्ला केला होता. त्याते ते ठार झाले होते. त्यानंतर वनविभागाने त्याला ठार मारण्याचे आदेश दिले होते. मात्र, वनविभागाने त्याला ठार न मारता पकडले होते. तेव्हा अकोले तालुक्यात फटागडे नावाचे अधिकारी होते.
अकोले तालुक्यात स्थानिक कर्मचाऱ्यांनी बिबट्याने हल्ला केला त्या ठिकाणचा शोध घेतला. त्यानंतर अभ्याव करुन पिंजरे लावले होते. त्यात त्याला भक्ष म्हणून कुत्रे, शेळी ठेवण्यात आली. चार- पाच दिवस गेल्यानंतर बिबट्या पिंजऱ्यात अडकला होता. नंतर वरिष्ठांच्या अदेशानुसार त्याला सोडून देण्यात आले होते.
कधी दिला जातो मारण्याचा आदेश
राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक यांना ज्यावेळी वन्यप्राण्यापासून धोका आहे याची खात्री पटते तेव्हा त्याला ठार मारण्याचा आदेश देतात. यासाठी त्याचा अभ्यास केला जातो. त्यानंतरच ठार मारण्याचे आदेश दिले जातात.