राहुरी तालुक्यात बर्ड फ्लूचा शिरकाव, कोंबड्यांची मान मोडायचा कार्यक्रम सुरू

विलास कुलकर्णी
Wednesday, 27 January 2021

सडे येथे मागील आठवड्यात श्लोक पोल्ट्री फार्ममधील चार-पाच कोंबड्या मृतावस्थेत आढळल्या. त्यांचे नमुने तपासणीसाठी भोपाळ येथे प्रयोगशाळेत पाठवण्यात आले.

राहुरी : सडे (ता. राहुरी) येथील श्लोक पोल्ट्री फार्ममधील मृत कोंबड्या  'बर्ड फ्ल्यू' पॉझिटिव्ह आढळल्या. भोपाळ येथील प्रयोगशाळेतून तसा अहवाल आला आहे.  

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने काल (मंगळवारी) रात्री अकरा वाजेपर्यंत पशुसंवर्धन विभागाच्या शीघ्र कृती दलाने पोल्ट्रीमधील चार हजार गावरान कोंबड्यांना मारुन, सर्व कोंबड्या, त्यांचे खाद्य व विष्ठा यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली. पोल्ट्रीफार्म व परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले.

सडे येथे मागील आठवड्यात श्लोक पोल्ट्री फार्ममधील चार-पाच कोंबड्या मृतावस्थेत आढळल्या. त्यांचे नमुने तपासणीसाठी भोपाळ येथे प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. सोमवारी (ता. २५) रात्री त्यांचा अहवाल 'बर्ड फ्ल्यू' पॉझिटिव्ह आला.

काल (मंगळवारी) जिल्हाधिकारी (नगर) यांनी पोल्ट्रीमधील सर्व कोंबड्या कलिंग करून, विल्हेवाट करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या शीघ्र कृती दलाच्या पथकाने पीपीई किट घालून, पोलीस बंदोबस्तात मंगळवारी रात्री उशिरापर्यंत चार हजार कोंबड्यांची विल्हेवाट लावली. यावेळी तहसीलदार फसियोद्दीन शेख व महसूलचे कर्मचारी उपस्थित होते.

सडे येथे कोंबड्यांची मरतूक आढळल्यानंतर पोल्ट्री फार्मच्या सभोवताली एक किलोमीटर त्रिज्येच्या परिसरातील शेतकऱ्यांच्या घरगुती कोंबड्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानुसार, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे चार जणांचे एक पथक असे ३२ जणांचे आठ पथकांनी पोलीस बंदोबस्तात घरोघरी जाऊन, कोंबड्यांची विल्हेवाट लावली.  

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने पोल्ट्री फार्म पासून दहा किलो मीटर परिसरातील कोंबड्यांची वाहतूक, विक्री व खरेदीवर ९० दिवसासाठी बंदी घालण्यात आली आहे. 

राहुरीच्या पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष पालवे म्हणाले, ""कुक्कुट पालन फार्ममधील कोंबड्या अनैसर्गिक मरतूक होत असल्याचे आढळल्यास, पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा.

जेणेकरून रोगाचा प्रसार थांबवता येईल. 'बर्ड फ्ल्यू' अजूनही सीमित स्वरूपात आहे. 'बर्ड फ्ल्यू' मुळे मनुष्यहानी झाल्याचे आजपर्यंत भारतात आढळलेले नाही. त्यामुळे, सद्यस्थितीत अंडी व चिकन खाण्यासाठी कोणताही धोका नाही."

 

"पोल्ट्री फार्म मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यांच्यावर ही नैसर्गिक आपत्ती कोसळली आहे. त्यांचा कोणताही दोष नाही.  त्यांना शासनातर्फे नुकसान भरपाई मिळावी. अशी मागणी आहे.  

- चंद्रकांत पानसंबळ, सरपंच, सडे."

"सडे येथील श्लोक पोल्ट्री फार्म मधील चार हजार गावरान कोंबड्यांची शास्त्रोक्त पद्धतीने कलिंग करून विल्हेवाट लावली आहे. त्याचा महसूल खात्याने पंचनामा केला आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे नुकसान भरपाई दिली जाईल.

- फसियोद्दीन शेख, तहसीलदार, राहुरी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Outbreak of bird flu in Rahuri taluka