मधुकर पिचडांचे पवारप्रेम कायम.. पडळकरांना म्हणाले, भान ठेवून बोला

शांताराम काळे
Monday, 29 June 2020

देशाच्या राजकारणात पवार यांचे महत्त्व अनन्यसाधारण असून, टीका करणाऱ्यांनी त्यांच्या वयाचे भान ठेवावे. त्यांच्या योगदानाची उंची पाहून बोलले तर बरे होईल

अकोले : माजी मंत्री, ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांनी राष्ट्रवादी व ज्येष्ठ नेते शरद पवार यांची साथ सोडल्यानंतर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. परंतु ते भाजपात गेल्यानंतरही त्यांचे पवारप्रेम अजूनही कायम आहे. त्यांच्यावर टीका करणाऱ्यांची उंची काढताना पवारांनी केलेल्या योगदानाचीही नव्या पिढीला त्यांनी आठवण करून दिली. मोठ्या माणसाबाबत बोलताना आपल्या राजकीय उंचीचेही भान ठेवले पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी कान उपटले. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे वक्तव्याने ते व्यथित झाले आहे, अशी त्यांनी भावना व्यक्त केली.

""भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी अत्यंत खालच्या पातळीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर केलेली टीका माझ्या मनाला दुःख देणारी आहे. सवंग प्रसिद्धीसाठी भडक बोलणे, ही आता "फॅशन' झाली आहे. पवार हे देशव्यापी नेतृत्व अाहे. त्यांच्यावरची टीका दुर्दैवी आहे,'' असे मत माजी मंत्री मधुकर पिचड यांनी व्यक्त केले. 

हेही वाचा - तनपुरे बंद पाडला कोणी, जाब विचारता कोणाला

राजूर येथील निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना पिचड म्हणाले, ""आपण भाजपमध्ये गेलो असलो, तरी शरद पवार यांना आपण जवळून पाहिले आहे. सर्वसामान्य, शेतकरी, कामगार, कष्टकरी वर्गाच्या सर्वांगीण विकासात त्यांचे योगदान नाकारून चालणार नाही. ते देशव्यापी नेतृत्व असून, (स्व.) यशवंतराव चव्हाण, (स्व.) वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक यांच्यानंतर शरद पवार यांचे नेतृत्व सर्व जातिधर्मांना, सर्वांना बरोबर घेऊन राजकारण, समाजकारण करणारे राहिले.'' 

ते म्हणाले, ""देशातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असलेल्या नेतृत्वावर अतिशय छोट्या माणसाने टीका करणे योग्य नाही. हे निषेधार्थ आहे. मी राजकारणातून निवृत्त झालो असलो, तरी अशा घटनांनी मन व्यथित होते. गेल्या 40 वर्षांचा अनुभव आणि सध्या वय 80 आहे. त्यात आपण पवार यांच्यासोबत अनेक वर्षे काम केले. त्यांच्यावर अशा प्रकारची टीका बऱ्याचदा झाली असेल; पण ते निश्‍चल आहेत. अशा टीकांनी ते कधीच अस्थिर झाले नाहीत. छोट्या कार्यकर्त्यांना माझ्या नेहमी सूचना असतात, की मोठ्या माणसांबाबत बोलताना आपली कुवत पाहून बोलावे.'' 

देशाच्या राजकारणात पवार यांचे महत्त्व अनन्यसाधारण असून, टीका करणाऱ्यांनी त्यांच्या वयाचे भान ठेवावे. त्यांच्या योगदानाची उंची पाहून बोलले तर बरे होईल, असा सल्लाही पिचड यांनी दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Padalkar's statement is a publicity stunt