तनपुरे कारखाना बंद पाडला कोणी, जाब विचारता कोणाला...खासदार विखे पाटलांचा सवाल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी सहकारी संस्थांचे वाटोळे करून, स्वतःच्या मालकीचा कारखाना काढला. त्यांना कोणी जाब विचारायला तयार नाही. कारखाना वाचवण्यासाठी धडपडणारे माजी आमदार शिवाजी कर्डिले व विद्यमान संचालक मंडळास जाब विचारणे. म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी दिल्यासारखे आहे

राहुरी ः डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्यास थकबाकी प्रकरणी नगर जिल्हा सहकारी बँकेकडून नोटीस मिळाली आहे. आरबीआयच्या नियमाप्रमाणे नोटीस अपेक्षित आहे. या कारवाईला काही लोकांनी विखे-कर्डिले वादाचे स्वरुप दिले. त्यामुळे, सहकारात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मनोबलावर विपरित परिणाम होत आहे.  

तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी सहकारी संस्थांचे वाटोळे करून, स्वतःच्या मालकीचा कारखाना काढला. त्यांना कोणी जाब विचारायला तयार नाही. कारखाना वाचवण्यासाठी धडपडणारे माजी आमदार शिवाजी कर्डिले व विद्यमान संचालक मंडळास जाब विचारणे. म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी दिल्यासारखे आहे. असे तनपुरे कारखान्याचे मार्गदर्शक खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे सांगितले.

हेही वाचा - लिंबू कोणी पाडिलं रे..लिंबू कोणी पाडिलं

खासदार डॉ. विखे पाटील यांनी पत्रकात म्हंटले की, "तनपुरे साखर कारखान्याची आजची दूरवस्था एका दिवसात झालेली नाही. एकेकाळी कारखान्याची गणना अतिशय संपन्न अशा संस्थांमध्ये होत होती. आजची दुरावस्था, थकीत कर्ज फेडण्यासाठी मालमत्तांची विक्री, इतर पूरक प्रकल्प बंद पडणे, कोणाच्या काळात झाले. याचा विसर सभासदांना पडलेला नाही.शेतकरी , सभासद, कामगार हित लक्षात घेऊन परिवर्तन मंडळाने सत्तेवर येताच थकित एफआरपी दिली. कामगारांचे अंशतः देणी दिली. दोन वर्ष यशस्वीपणे गळीत हंगाम पूर्ण केला."

"दुष्काळामुळे उसाच्या टंचाईमुळे कारखाना सुरू करता आला नाही. जिल्हा सहकारी बँकेला कर्जाचे हप्ते कारखाना देऊ शकला नाही. त्यामुळे आरबीआयच्या निकषाप्रमाणे थकबाकीसाठी बँकेने कारखान्यास नोटीस दिली. माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केलेल्या सहकार्यामुळेच कारखाना सुरू होऊ शकला. याबद्दल कुणालाच शंका नसावी. त्यामुळे, एकीकडे बंद पडलेला, अवसायानात निघू शकणारा शेतकऱ्यांचा मालकीचा कारखाना वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या माजी आमदार कर्डिले व विद्यमान संचालक मंडळास जाब विचारणे म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी दिल्यासारखे आहे."

"जिल्हा बँकेच्या कारवाईला विखे-कर्डिले वादाचे स्वरूप  देऊ नये. सभासद व कामगारांच्या हितासाठी विखे व कर्डीले दोघेही कटिबद्ध आहेत. जिल्हा बँकेची कारवाई ही नियमाप्रमाणे असल्याने आरबीआयच्या नियमांना अधीन राहून शेतकऱ्यांच्या हितासाठी बँक सकारात्मक निर्णय घेईल. अशी मला खात्री आहे. त्यासाठी संचालक मंडळाने  बँकेकडे मुदतीसाठी अर्जसुद्धा केले आहे." असेही खासदार डॉ.‌ विखे पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Who closed the Tanpure factory ... Vikhe Patil's question