आदिवासी पट्ट्यात हळव्या भाताची काढणी जोरात

शांताराम काळे
Monday, 12 October 2020

आदिवासी पट्ट्यातील मुख्य पीक असलेले भात काढणीस सुरुवात झाली आहे. हळवे भात म्हणजेच लवकर येणारे भाताचे वाण. हे वाण शेतात तयार झालेले असल्याने शेतकरी मोठ्या लगबगीने भात काढण्याच्या कामाला लागलेला आहेत.

अकोले (अहमदनगर) : आदिवासी पट्ट्यातील मुख्य पीक असलेले भात काढणीस सुरुवात झाली आहे. हळवे भात म्हणजेच लवकर येणारे भाताचे वाण. हे वाण शेतात तयार झालेले असल्याने शेतकरी मोठ्या लगबगीने भात काढण्याच्या कामाला लागलेला आहेत. 

जागोजागी शेतावर खळे तयार करण्यात आलेले आहे. अवकाळी पावसाच्या भीतीपोटी शेतकरी तयार झालेले भात लवकरात लवकर काढून तयार करण्याच्या मागे लागलेले आहेत. आदिवासी पट्ट्यातील  देवगाव, मान्हेरे, वाकी, टिटवी, कोंदणी, पेंडशेड, वारंघुशी, उगलेवाडी, बाभुळवंडी, लाडगाव, खिरविरे, जायनावाडी, एकदरे, पिंपळदरावाडी, चंदगिरवाडी, पेढेवाडी शिवाजीनगर, तिरडे, पाचपट्टा, बिताका या भागात भात काढण्यासाठी सरसावलेला आहे.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
बहुसंख्य शेतकरी हळवे म्हणजे लवकर येणारे भात लागवड करत असतात. डोंगर उतारालगत असलेली शेती व बाहेरून पाणी देण्याची सोय नसलेले शेते बहुसंख्य करून हळव्या भात लागवडीखाली आलेले असतात. या हळव्या भाताची कापणी ही तुलनेने लवकर होत असते.

हळवे भात 100 ते 120 दिवसात तयार होत असतात. यंदा सुरुवातीला झालेला चांगला पाऊस आणि त्यानंतर ठराविक अंतराने पडत गेलेल्या पाऊस यामुळे भात उत्पादन समाधानकारक होण्याची शक्यता आहे. बहुसंख्य शेतकरी वर्गाने हळवी कोळपी, पुनम यासारखे हळवे वाण मोठ्या प्रमाणात लागवड केलेले आहेत. त्यांची काढणी आता जोरात सुरू आहे. वरुणराजाने कृपा करून थोडी विश्रांती घ्यावी व हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांना मिळावा. यासाठी शेतकरी राजा प्रार्थना करत आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Paddy harvesting started in Akole taluka due to rain