esakal | नीलेश लंकेंची भलतीच क्रेझ, गावोगावी होतेय पाद्यपूजन
sakal

बोलून बातमी शोधा

नीलेश लंकेंची पाद्यपूजा

नीलेश लंकेंची भलतीच क्रेझ, गावोगावी होतेय पाद्यपूजन

sakal_logo
By
शांताराम जाधव

बोटा (संगमनेर) : पारनेरचे आमदार नीलेश लंके यांची क्रेझ दिवसेंदिवस वाढते आहे. दुसऱ्या मतदारसंघातून त्यांना कार्यक्रमाची निमंत्रणे येऊ लागलीत. गावोगावी त्यांची पाद्यपूजा होते आहे. त्यांच्यावर पुष्पवृ्ष्टी होते आहे. कोविडच्या काळात त्यांनी केलेल्या कामाची अशा रितीने पावती मिळते आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कालच त्यांच्या कामाची माहिती घेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.

संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा येथे शनैश्वर जंयतीनिमित्त नागरिकांनी आयोजित रक्तदान शिबिराच्या उदघाटनासाठी आमदार लंके यांना बोलावण्यात आलं होतं. या प्रसंगी तरूणांनी लंके यांचे पाय धुऊन व मस्तकी पुष्ष वर्षाव करीत पूजन केले. या अनोख्या पाहुणचाराची परिसरात चर्चा सुरू आहे. शिबिरात सहभागी झालेल्या पंच्चावन्न तरूणांनी रक्तदान केले. विशेष म्हणजे लंके यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी रात्री दहा वाजेपर्यंत जनसमुदाय उपस्थित होता. यात तरुण वर्ग आघाडीवर होता. (Padya Puja of MLA Nilesh Lanke in Sangamner taluka)

हेही वाचा: कांडेकर खून खटला ः पॅरोलवर सुटलेल्या कैद्याची गळा चिरून हत्या

" देशातील कोविड सेंटर ही आरोग्य मंदिरे व्हावीत. रक्तदानाने कुटुंबातील नाती वाचविली जातात. भाळवणीतील कोविड सेंटरने आजतागायत आठ हजार रुग्णांवर उपचार केले.अडीचशे रूग्णांना मृत्यूच्या दाढेतून वाचविले आहे. येथे मानसिक आधार देणे, आत्महत्येपासून परावृत्त करणे, मनातील भीती घालविणे या गोष्टींना महत्त्व दिले असल्याने हे कोविड सेंटर राज्यात अव्वल ठरले. गंभीर परिस्थितीतील तेवीस कोविड स्कोर, अवघी ३० अॉक्सीजन लेवल, ७८० पर्यंतची उच्च शुगर लेवल असलेले विविध रूग्णांना वाचविण्यात मिळालेले यश ही आमच्या कार्याची पोचपावती आहे." अशा शब्दांत कोरोना काळातील कार्याचे वर्णन पारनेर तालुका मतदार संघाचे आमदार तरुणांचे राजकीय प्रेरणास्थान नीलेश लंके यांनी केले.

आपल्या राजकीय जीवनाबद्दल लंके म्हणाले " केवळ निवडणुकीच्या काळात माझ्याकडे बघा असे म्हणणारा मी नाही. भले मी राजकारणी जरी असलो तरी शंभर टक्के समाजकारण करतो. म्हणून मी तालुकासह संपूर्ण महाराष्ट्राचा आमदार आहे. माझी गाडी जनता बससारखी आहे.हात दाखवा नि थांबवा. सध्याच्या काळात समाजकारणासाठी राजकीय जोडे बाजूला ठेवणे आवश्यक आहे." दरम्यान यापुढील काळात गाव कारभा-यांनी ग्रामआरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कोरोना रूग्णांशी दुजाभाव टाळणे. प्रत्येक माणूस या संकटातून वाचेल असा ध्यास तरूणांनी धरावा. संपत्ती पेक्षा सेवाभाव अंगिकारणे अशा अपेक्षा लंके यांनी व्यक्त केल्या.

सरपंच बाळासाहेब ढोले, उपसरपंच सुरेश कान्होरे, गणेश धात्रक, गोकुळ कहाणे, चैतन्य कहाणे उपस्थित होते.((Padya Puja of MLA Nilesh Lanke in Sangamner taluka))