परिवर्तन फाउंडेशनची रस्त्यांसाठी गांधीगिरी, जागोजागी लावले फलक

सनी सोनावळे
Friday, 30 October 2020

या रस्त्यावर अतिशय भयंकर असे खड्डे पडले असून नागरिकांचा जीव या खड्ड्यांमुळे गमावण्याची वेळ आली आहे ,खड्य्यांचे टेंडरसुद्धा टक्केवारीत अडकले आहे का? असा सवाल देखील परिवर्तन फाउंडेशन चे सचिन भालेकर यांनी विचारला आहे.

टाकळी ढोकेश्वर - पारनेर तालुक्यातील रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि त्या अनुषंगाने पारनेर तालुका परिवर्तन फाउंडेशन सातत्याने रस्ते दुरुस्तीसाठी मागणी करीत आहे आणि अनेकदा यासाठी आंदोलनेदेखील केली आहेत.

प्रशासन मात्र याबाबत गंभीर नाही असे दिसून येते म्हणूनच आता अभिनव आणि गांधीगिरी मार्गाने आंदोलन करत कुरुंद ते अळकुटी या मार्गावर जवळपास 50 जागृती फलक लावून यावर वाहने सावकाश चालविण्याबाबत संदेश दिला गेला आहे. खड्डे सौजन्य पी डब्लू डी अश्या प्रकारे प्रशासनाला यासाठी जबाबदार धरले आहे .

या बाबतचे फलक अचानक सगळीकडे दिसू लागल्याने पारनेर परिवर्तनाच्या या उपक्रमाची चर्चा पूर्ण तालुक्यात झाली. जोपर्यंत पारनेर तालुका पूर्णतः खड्डेमुक्त होत नाही आणि तालुक्यातील जनतेची मूलभूत गरज असणारे रस्ते चांगले होत नाही तोपर्यंत परिवर्तन चे आंदोलन सुरू राहील. पुढील काही दिवसात गाढव धिंड, खड्यात सत्यनारायण महापूजा आणि वेळप्रसंगी धरणे आंदोलन परिवर्तन तर्फे केले जाईल.

या रस्त्यावर अतिशय भयंकर असे खड्डे पडले असून नागरिकांचा जीव या खड्ड्यांमुळे गमावण्याची वेळ आली आहे ,खड्य्यांचे टेंडरसुद्धा टक्केवारीत अडकले आहे का? असा सवाल देखील परिवर्तन फाउंडेशन चे सचिन भालेकर यांनी विचारला आहे.

परीवर्तनने अनेकदा या बाबत विनंती केली, निवेदने दिली पण संबंधित अधिकारी हे निर्ढावले आहेत आणि त्यामुळेच यापुढे अशीच अचानक आंदोलने हाती घेतली जातील ,त्याचप्रमाने या सगळ्या रस्त्यांची ऑडिट होणे गरजेचे आहे आणि भ्रष्ट अधिकारी किंवा जे कुणी या दुरावस्थेस जबाबदार असतील त्यांची जागा तुरुंगात आहे अशी प्रतिक्रिया फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन भालेकर यांनी दिली.

रस्त्यावर जे फलक लावले त्यात पारनेर परिवर्तन चे सुकाणू समिती अध्यक्ष सुहास शेळके , अध्यक्ष सचिन भालेकर , पदाधिकारी विकास वाजे, सागर भगत हे स्वतः रात्रभर उपस्थित राहून फलक लावण्याचे काम करत होते. माझ्यासाठी कोणत्याही राजकिय पक्षापेक्षा नागरिकांचे जीवन महत्वाचे आहे असे मत सुहास शेळके यांनी यावेळी व्यक्त केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parivartan Foundation's roadside billboards