
Accident: दुर्दैवी! नगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात; भाऊ-बहिणीचा जागीच मृत्यू, सहा जण गंभीर
टाकळी ढोकेश्वर: नगर-कल्याण महामार्गावरील धोत्रे शिवारात आज (शनिवारी) सकाळी आठ वाजता तीन वाहनांच्या भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले.
प्रीती धनंजय भावसार, वेदांत धनंजय भावसार, चालक रोशन (पूर्ण नाव माहीत नाही, सर्व रा. कांदिवली पूर्व, मुंबई) अशी मृतांची नावे आहेत. याबाबत माहिती अशी की, मुंबई येथील भावसार कुटुंब शनिवारी सकाळी कारमधून (एमएच- १५ जेसी- १९०३) नगरकडे येत होते.
धोत्रे शिवारातून टेम्पो (एमएच- ०५ एएम- २७) टाकळी ढोकेश्वर दिशेकडे जात असताना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या स्कूल बसमुळे टेम्पो चालकाला ओव्हरटेक करताना समोरचे वाहन न दिसल्याने टेम्पोची कारला समोरासमोर जोराची धडक बसली.
या अपघातात कारमधील प्रीती धनंजय भावसार, वेदांत धनंजय भावसार व चालक रोशन यांचा मृत्यू झाला, तर जान्हवी अजय भावसार, अर्पिता धनंजय भावसार, ऋषिकेश अजय भावसार, धनंजय लकडू भावसार, जयेश प्रशांत भावसार, ओम प्रशांत भावसार हे सहा जण जखमी झाले. एका जखमीची प्रकृती गंभीर आहे.
पोलिस उपनिरीक्षक विजय ठाकूर, पोलिस नाईक मच्छिंद्र खेमनर, ज्ञानेश्वर साळवे, अण्णा भांड, रंगनाथ भांड, अण्णा फाटक, बंटी मिडगे, विलास रोकड, बाबा भांड, राजू रोडे, सुभाष रोडे, दत्ता सासवडे, दत्ता भांड यांनी अपघातग्रस्तांना मदत केली.
झाडाला कार आदळून महिलेचा मृत्यू
भंडारदरा येथे काजवा महोत्सव पाहून पुण्याला घरी जात असताना कोल्हार-घोटी राज्यमार्गावर झाडाला कार धडकून झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला, तर एक मुलगी व एक मुलगा जखमी झाला. त्यांची प्रकृती गंभीर असून, त्यांना उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. हा अपघात काल (शुक्रवारी) मध्यरात्रीनंतर दोनच्या सुमारास घडला.
रेखा लाहोटी (वय ४२) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे, तर शिवप्रसाद लाहोटी, तन्ही लाहोटी, अशी जखमींची नावे आहेत. पुण्यातील तुषार लाहोटी, रेखा लाहोटी, तन्वी लाहोटी, शिवप्रसाद लाहोटी हे कुटुंब शुक्रवारी (ता. २) भंडारदरा पाणलोट क्षेत्रात काजवा महोत्सव पाहण्यासाठी आले होते. त्यांच्या समवेत आणखी दोन कुटुंबे होती.
या सर्वांनी भंडारदरा येथे एका हॉटेलमध्ये जेवण घेतले. त्यानंतर ते काजवे पाहण्यासाठी घाटघर- पांजरे परिसरात गेले. मध्यरात्री काजवे पाहून ते सर्व जण घराकडे निघाले.
लाहोटी कुटुंब कोल्हार घोटी महामार्गाने कारमधून संगमनेरला येत होते. कार नवलेवाडी फाट्यावर आली असता, तुषार लाहोटी यांचा वाहनावरील ताबा सुटला व वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या वडाच्या झाडावर जाऊन आदळले.
अपघातामुळे मोठा आवाज झाला. परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळाकडे धावले. कारचे चारही दरवाजे बंद झाले होते. ते तोडून जखमींना बाहेर काढण्यात आले.
तुषार लाहोटी शुद्धीत आल्यावर त्यांच्याकडून नातेवाइकांचा संपर्क क्रमांक घेऊन तातडीने संपर्क करण्यात आला. जखमी शिवप्रसाद, तन्वी यांना संगमनेर येथे उपचारासाठी हलविण्यात आले. तेथून त्यांना पुण्यातील रुग्णालयात हलविण्यात आले.