कोरोना लसीकरणाची पाथर्डीत रंगीत तालिम

राजेंद्र सावंत
Saturday, 9 January 2021

उपजिल्हा रुग्णालयातील 25 अधिकारी-कर्मचाऱ्यांची चाचणी घेण्यात आली. लस देण्यासाठी एकूण तीन वॉर्ड बनविले आहेत.

पाथर्डी : कोरोना लस देण्याची रंगीत तालिम येथील उपजिल्हा रुग्णालयात यशस्वीरित्या करण्यात आली. मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक कराळे व डॉ. चेतन खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सरावफेरी करण्यात आली.

नागरिकांना ही लस कशा पद्धतीने द्यावी, याबाबतचे प्रशिक्षण उपजिल्हा रुग्णालयातील पाच कर्मचाऱ्यांना पूर्वीच दिले होते. 
कोरोना लसीकरणासाठी देशातील 63 जिल्ह्यांची निवड करण्यात आली होती.

हेही वाचा - गावकीच्या राजकारणात माजी आमदार कर्डिलेंची व्याह्यासोबतच फाइट

नगर जिल्ह्यात नगर शहरासह वाळकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयाची निवड केली होती. कोरोना लसीकरणाबाबतचे पूर्वप्रशिक्षण उपजिल्हा रुग्णालयातील राम गिरी, शीतल खंडागळे, आरती डोंगरे, सारिका तमखाने व मीना जगधने या कर्मचाऱ्यांनी घेतले आहे.

उपजिल्हा रुग्णालयातील 25 अधिकारी-कर्मचाऱ्यांची चाचणी घेण्यात आली. लस देण्यासाठी एकूण तीन वॉर्ड बनविले आहेत. 
सुरवातीला हेल्थकेअर वर्कर्स, डॉक्‍टर, सिस्टर, वॉर्डबॉय, सफाई कर्मचारी, सैनिक, तसेच 50 पेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठांना ही लस दिली जाणार आहे.

लस दिल्यावर काही त्रास झाला, तर उपचारासाठी आवश्‍यक सर्व सुविधा उपलब्ध असल्याचे डॉ. अशोक कराळे यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pathardi test of corona vaccine successful