तुम्ही कस्टमरकडून गुगल पे, फोन पेद्वारे पैसे घेताय का? सावध व्हा, नाही तर लागेल चुना

सूर्यकांत वरकड
Monday, 9 November 2020

नगर-सोलापूर रस्त्यावरील सिद्धी पेट्रोलपंपावर रविवारी (ता. 8) दुपारी अडीचच्या सुमारास मोटार इंधन भरण्यासाठी आली. तीत चौघे बसले होते.

नगर : शहराजवळील पेट्रोलपंप चालकासह विविध व्यावसायिकांना ऑनलाइन खरेदीच्या माध्यमातून गंडा घालणारी टोळी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आज पिंपरी-चिंचवड येथून गजाआड केली. संजय अशोक सोनार (वय 19), शुभम भगवान सोनवणे (वय 24), राजू श्रीहरिलाल गुप्ता (वय 21), रवी उत्तम पटेल (वय 19, सर्व रा. भोसरी, पुणे) अशी आरोपींची नावे आहेत. 

नगर-सोलापूर रस्त्यावरील सिद्धी पेट्रोलपंपावर रविवारी (ता. 8) दुपारी अडीचच्या सुमारास मोटार इंधन भरण्यासाठी आली. तीत चौघे बसले होते. त्यांनी तीन हजार रुपयांचे पेट्रोल भरले. "क्‍यूआर कोड' स्कॅन करून ऑनलाइन पैसे भरले. तसा मेसेज पेट्रोलपंप व्यवस्थापकाला दाखवून मोटारीतून भरधाव निघूनही गेले.

पेट्रोलपंप व्यवस्थापक प्रमोद खरे यांनी बॅंक खाते तपासले असता, त्यावर तीन हजार रुपये जमा झाले नव्हते. कारचालकाने खोटा मेसेज पाठवून, पैसे ऑनलाइन ट्रान्स्फर झाल्याचे भासविले. त्यात फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी कारचा पाठलाग सुरू केला.

याबाबत पेट्रोलपंप मालकाला माहिती मिळताच, त्यांनी तत्काळ स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला कळविले. संबंधित मोटारीतील तरुण दरेवाडी परिसरात फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांना मिळाली. त्यानुसार पोलिस हेडकॉन्स्टेबल सुनील चव्हाण, संदीप पवार, ज्ञानेश्‍वर शिंदे, योगेश सातपुते यांनी दरेवाडी येथे जाऊन मोटारीला घेराव घातला आणि वरील आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी पेट्रोलपंप चालकाची फसवणूक केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून दोन मोबाईल, विविध कंपन्यांचे बूट, सॅंडल व गुन्ह्यात वापरलेली मोटार पोलिसांनी जप्त केली. 
याबाबत पेट्रोलपंप व्यवस्थापक प्रमोद अशोक खरे यांच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. वरील आरोपींविरुद्ध रांजणगाव गणपती, कोतवाली पोलिस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याचेही समजले. 

दोन दिवसांत अनेकांना गंडा 
आरोपींनी मागील दोन दिवसांत रॉयल फूटवेअर (रांजणगाव गणपती), साईकृपा कम्युनिकेशन (वसंत टॉकीज, माळीवाडा, नगर), अर्णव मोबाईल शॉपी (कारेगाव, पुणे) व हॉटेल आयरिश (नगर) यांनाही अशाच प्रकारे गंडा घातल्याचे समोर आले आहे. 

अशी करीत फसवणूक 
दुकानातून वस्तू खरेदी केल्यानंतर ते क्‍यूआर कोडच्या माध्यमातून "गुगल-पे', "फोन-पे'वर ऑनलाइन पैसे भरत. त्याचा मेसेजही दुकानदाराच्या मोबाईलवर येत असे; पण प्रत्यक्षात दुकानदाराच्या खात्यावर पैसे जमा होत नसत. पैसे जमा झाल्याचा बनावट मेसेज ते अँड्रॉईड ऍपच्या माध्यमातून तयार करीत. किरकोळ रक्कम असल्याने, त्याची कोणी तक्रार करीत नव्हते. शिवाय, अनेक जण बरेच दिवस बॅंक खाते तपासत नसल्याने, फसवणूक लक्षात येत नसे. 
 

छोट्या-छोट्या व्यावसायिकांनी "क्‍यूआर कोड'च्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहावे. "क्‍यूआर कोड'च्या माध्यमातून पैसे घेतल्यानंतर तत्काळ बॅंक खाते तपासावे. त्यामुळे पैसे जमा झाले की नाही, हे लक्षात येईल. 
- मनोज पाटील, पोलिस अधीक्षक 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pay, caught the money transfer gang by phone pay ahmednagar news