esakal | वीजवाहिनीच्या कामामुळे अकोले रस्त्याची धुळधाण
sakal

बोलून बातमी शोधा

Pits on the road near ST stand in Sangamner

अकोले बाह्यवळण रस्त्याला शिक्षणशास्त्र महाविद्यालयाजवळ मिळणारा अकोले रस्ता मोठा वर्दळीचा आहे.

वीजवाहिनीच्या कामामुळे अकोले रस्त्याची धुळधाण

sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर (अहमदनगर) : येथील बसस्थानकाच्या उत्तरेकडून अकोले बाह्यवळण रस्त्याला शिक्षणशास्त्र महाविद्यालयाजवळ मिळणारा अकोले रस्ता मोठा वर्दळीचा आहे. अकोल्याकडे जाणाऱ्या एसटी बस, रुग्णवाहिका, असंख्य दुचाकी व चारचाकी वाहनांची कायम वर्दळ असलेल्या या मार्गाची सध्या दुरवस्था झाली आहे.

मागील आठवड्यात वीज वितरण कंपनीने वीजवाहिनी भूमिगत करण्यासाठी जेसीबीने चर खोदून केबल टाकल्या आहेत. त्यात विविध विक्रेत्यांमुळे गर्दी वाढली असून, शहरातील या महत्त्वाच्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती व डांबरीकरण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

कोरोना प्रादुर्भावाच्या काळात नगरपरिषदेने नेहरू चौक व मालदाड रस्त्यावरील भाजीपाला बाजाराचे विभाजन करून, शिक्षणशास्त्र महाविद्यालयाजवळ रस्त्याच्या दुतर्फा विक्रेत्यांना जागा नेमून दिली होती. गेल्या आठ महिन्यांत या ठिकाणी बसणाऱ्या किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. व्यापारी व ग्राहकांनाही वळण पडल्याने, भाजीपाल्यासह कटलरी, फळविक्रेत्यांनीही ठाण मांडले. विक्रेते व ग्राहकांमुळे रस्त्यावरील वाहतुकीला अडथळे निर्माण झाल्याने, गेल्या मंगळवारी पालिकेने या रस्त्यावरील भाजीपाला व स्वेटर विक्रेत्यांची दुकाने हटविली. त्यामुळे रस्ता मोकळा श्वास घेत असतानाच, दुसऱ्या दिवसापासून परिस्थिती पुन्हा "जैसे थे' झाली. एकेक करीत सर्व विक्रेते जागा अडवून बसले आहेत.

या रस्त्यावरील पेट्रोलपंप परिसरात, तसेच अन्यत्रही लहान-मोठे असंख्य खड्डे पडले होते. दैनंदिन वर्दळीमुळे ते अधिक वाढले. त्यातच या मार्गावर असलेले सर्कल व धोकादायक वाळणामुळे अपघातांची शक्‍यता बळावली आहे.

संपादन : अशोक मुरुमकर

loading image