पोलिसांनी सिनेमा स्टाईल दरवाजा तोडून आरोपीस केलं जेरबंद

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 10 December 2020

पोलिसांनी ध्वनिक्षेपकाद्वारे त्याला बाहेर येण्याचे आवाहन केले. मात्र, तो बाहेर येण्यास तयार नव्हता. तब्बल आठ तास पोलिस बंगल्याबाहेर तळ ठोकून होते.​

नगर : भिंगार कॅंटोन्मेंट नाक्‍यावरील कर्मचाऱ्यांना मारहाण करून रक्कम लुटल्याच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी लॉरेन्स दोराई स्वामी (वय 50, रा. भिंगार) याला पोलिसांनी त्याच्या आलिशान बंगल्याचा दरवाजा तोडून सिनेस्टाईल अटक केली. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नगर-सोलापूर रस्त्यावर भिंगार कॅंटोन्मेंट बोर्डाच्या जकात नाक्‍यावर 21 नोव्हेंबर रोजी रात्री काही तरुणांनी कर्मचाऱ्यांना मारहाण करून रक्कम लुटली होती.

हेही वाचा - नगरच्या शेतकऱ्यांना मिळाले चौदा कोटी

या बाबत भिंगार पोलिसांनी काही आरोपींना अटक केली. त्यांच्या चौकशीतून या गुन्ह्यात लॉरेन्स स्वामीचे नाव निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिस पथक त्याच्या मागावर होते.

तो आज घरी येणार असल्याची माहिती भिंगार कॅम्प पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस उपअधीक्षक विशाल ढुमे, सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण पाटील, राजेंद्र सुद्रिक, समीर शेख यांच्या पथकाने पहाटे पाथर्डी रस्त्यावरील "स्वामी रेसिडेन्सी' या लॉरेन्स स्वामीच्या बंगल्याला चोहोबाजूने वेढा दिला. 
पोलिस बंगल्यावर येणार असल्याची कुणकुण आधीच लागल्याने स्वामीने सर्व दरवाजे बंद केले.

पोलिसांनी ध्वनिक्षेपकाद्वारे त्याला बाहेर येण्याचे आवाहन केले. मात्र, तो बाहेर येण्यास तयार नव्हता. तब्बल आठ तास पोलिस बंगल्याबाहेर तळ ठोकून होते. अखेर दुपारी दोन वाजता पोलिसांनी दरवाजा तोडून बंगल्यात प्रवेश केल्यावर लॉरेन्स स्वामी पोलिसांना शरण आला. 

अटकपूर्व जामीन फेटाळला 
लॉरेन्स स्वामी याने घरात असताना अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. त्यावर सुनावणी होऊन न्यायालयाने जामीनअर्ज फेटाळून लावल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police broke down the cinema style door and arrested the accused