कर्डिलेंच्या चिरंजीवांना प्रशांतभाऊ-सुरेशअण्णांची राजकीय शिकवणी!

Political advice from Prashant Gadakh and Suresh Dhas to Akshay Kardile
Political advice from Prashant Gadakh and Suresh Dhas to Akshay Kardile
Updated on

अहमदनगर ः माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले म्हणजे एक अजब राजकीय व्यक्तिमत्त्व. दूध वाहता वाहता ते कधी आमदार झाले आणि आमदाराचे मंत्री झाले हे त्यांच्या विरोधकांना कळलेही नाही. ग्रामीण राजकारणाची नाडी त्यांच्या इतकी कदाचितच दुसऱ्या कुणाला समजत असेल.

डोक्यावर टोपी आणि अंगात नेहरू शर्ट असा त्यांचा पेहरावच बरेच काही सांगून जातो. त्यांचे चिरंजीव अक्षय यांचीही राजकारणात एन्ट्री झालीय. वडिलांच्या तालमीत ते राजकीय डाव शिकत आहेत. विविध गावांतील कार्यक्रम, उदघाटन सोहळ्यांना त्यांची उपस्थिती असते. तेथे ते भाषणही ठोकतात. 

असाच एक भिंगारमध्ये हॉस्पिटलचा उदघाटनाचा कार्यक्रम होता. डॉ. किशोर म्हस्के यांचे हे हॉस्पिटल आहे. हॉस्पिटलचे उदघाटन डॉ. दीपक यांच्या हस्ते झाले. डॉ. किशोर यांचे ते गुरू आहेत. या कार्यक्रमास आमदार सुरेश धस, यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत पाटील गडाख, आमदार डॉ. सुधीर तांबे, अनिल झोडगे, संजय सपकाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात अक्षय कर्डिले यांचे भाषण झाले. शुभेच्छा देताना ते रांगड्या स्टाईलमध्ये म्हणाले, "डॉक्टरसाहेब आमच्या परिसरात लोक तुमच्या हॉस्पिटलला येतेन. त्या लोकांचे आम्हाला बिल कमी करायला लावण्यासाठी फोन येतेन. तेव्हा तुम्हाला बिल कमी करावं लागन."

अक्षय यांचे भाषण झाल्यावर प्रशांत पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. अक्षय यांचा धागा पकडून ते म्हणाले, "बिल कमी करायला लावण्यासाठी आम्हालाही फोन येतात. गरीब रूग्णांचे बिल कमी करण्याबाबत मीही सहमत आहे. परंतु बागायतदार किंवा ज्याची परिस्थिती सक्षम आहे, असे लोकही आग्रह धरतात. अक्षय यांची मागणी योग्य आहे. मात्र, ती व्यक्तिसापेक्ष असली पाहिजे."

गडाख पाटील यांच्या सल्ल्यानंतर अक्षय यांनीही सहमती दर्शवली. आमदार धस यांच्याबाबत बोलताना गडाख म्हणाले, "सुरेशअण्णा जिवाला जीव देणारे मित्र आहे. त्यांच्याकडे काम घेऊन जाणारा माणूस कोणत्याही तालुक्यातील असला तरी त्याचे काम होतेच, ही त्यांची खासियत आहे."

त्यांच्यानंतर आमदार धस भाषणासाठी उठले. त्यांनीही अक्षय यांचा मुद्दा धरून बोलण्यास सुरूवात केली. "अक्षय हा राजकारणात नवीन आहे. पुढे चालून तो सगळे शिकेल. बिल कमी केली पाहिजे पण आवश्यक तेवढे बिल कमी करा असा शब्द त्याने वापरायला पाहिजे होता. असं केलं तर सगळेच खुश होतेत" त्यावर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. हे वक्तव्यही अक्षय यांनी दिलखुलासपणे स्वीकारले.

गडाख यांच्याविषयी बोलताना अण्णांनी चांगलीच बॅटिंग केली. "राजकारणातील सुसंस्कृतपणा यशवंतराव गडाख यांच्या कुटुंबाने जपला. प्रशांत हे माझ्यापेक्षा वयाने लहान असले तरी माझ्यापेक्षा ते सुसंस्कृतपणात खूप पुढे आहेत," असे म्हणताच कार्यक्रमात एकच हशा पिकला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.