नगरच्या लॉकडाउनमध्ये राजकारण...नेत्यांना काय वाटते

अशोक निंबाळकर
Tuesday, 21 July 2020

नगरमध्ये लॉकडाउन करा, असे विरोधकांचे म्हणणे आहे, तर सत्ताधारी म्हणतात, जे काही करायचे ते प्रशासन ठरवेल. लॉकडाउन हा काही पर्याय नाही. या सावळ्या गोंधळात दररोज शेकड्याने रूग्ण वाढत आहेत.

नगर ः शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. पाच-दहा रूग्णांचा आकडा कधी शेकड्यावर गेला हे कळंच नाही. आता तर साडेचारशे रूग्ण सापडले आहेत. कोरोनाची ही साखळी तोडताना प्रशासनाच्या नाकीनऊ येत आहेत. कोणत्या रूग्णामुळे कोण बाधित झाले कळायला मार्ग नाही.

कोरोनाची साखळी तोडायची असेल किंवा समूह संपर्क रोखायचा असेल तर लॉकडाउन... असेच केंद्र सरकारने आतापर्यंत केले. महाराष्ट्रातही पुण्यासारख्या शहरात ते सुरू आहे. नगरमध्ये समूह संपर्क सुरू झाला आहे. मात्र, लॉकडाउन किंवा जनता कर्फ्यू अशी कोणतीच उपाययोजना केली जात नाही. 

ज्या भागात रूग्ण सापडत आहेत, तेथील भाग कंटेन्मेंट किंवा बफर झोन केला जातो. नगर शहरात केडगावातील भूषणनगर, तोफखाना, सिद्धार्थनगर, भिस्तबाग परिसर, श्रमिकनगर, सूर्यानगर असे बहुतांशी शहर कंटेन्मेंट झाले आहे. परंतु लॉकडाउनसारखी परिस्थिती नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

हेही वाचा - गावगाडा चालविण्यासाठी काळजावर दगड ठेवून निर्णय घेतला

सध्या लग्नसराई जोरात सुरू आहे. खरेदीसाठीही लोक बिनधास्तपणे बाहेर पडतात. कोरोनाची भीती असतानाही अंत्यविधी, दशक्रिया विधी, बाजारहाट सुरू आहे. नगर शहरात व जिल्ह्यात जेथे रूग्ण सापडत आहेत, तेथे लॉकडाउन केला पाहिजे, असे भाजप नेत्यांना वाटते. मनसेच्या सुमित वर्मा यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांचेही तेच म्हणणे आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना नेते म्हणतात विरोधक राजकारण करतात. आणि विरोधक म्हणतात, यांना कारभारच चालविता येत नाही.

ही आहे चर्चा..

लॉकडाउनमुळे अनेक लोकांचे व्यवसाय देशोधडीला लागले आहेत. खासगी उद्योग सुरू नसल्याने अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. हातावरचे पोट असणाऱ्यांची हालत खूपच खराब आहे. पुन्हा लॉकडाउन केले तर लोकांमध्ये रोष निर्माण होईल, त्याला कसे सामोरे जायचे म्हणून लॉकडाउनचा निर्णय घेतला जात नसल्याची चर्चा कोपऱ्या कोपऱ्यावर सुरू आहे. 

 

मी डॉक्टर आहे.. म्हणून सांगतो

खासदार डॉ. सुजय विखे यांनी तर जाहीरपणे लॉकडाउनसंदर्भात म्हणणे मांडले आहे. मी एक डॉक्टर आहे. आता लॉकडाउन केला नाही तर वाढणाऱ्या रूग्णांची जबाबदारी कलेक्टरांवर असेल.

डॉ. सुजय विखे पाटील,

खासदार, नगर.

 

तीन मंत्री काय कामाचे

सध्या जिल्ह्यात भयानक स्थिती आहे. दररोज शेकड्याने रूग्ण सापडत आहेत. वाढत्या रूग्ण संख्येमुळे सर्वसामान्य जनता भयभित झाली आहे. मात्र, सरकारकडून काहीच उपाययोजना केल्या जात नाहीत. नगरचे पालकमंत्री तिकडे बसून इकडचा कारभार करतात. त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे प्रशासनाला मोठे निर्णय घेता येत नाहीत. जिकडे गरज आहे तिकडे लॉकडाउन करून कोरोनाची ही साखळी तोडली पाहिजे. तीन मंत्री असून एकही कामाचा नाही.

- राम शिंदे, माजी पालकमंत्री, प्रदेश उपाध्यक्ष, भाजप.

 

प्रशासनाचा रिपोर्ट महत्त्वाचा

जिल्ह्यात व शहरात काय स्थिती आहे, याची प्रशासनाला पूर्ण जाण आहे. महापालिका आयुक्त आरोग्य विभाग, जिल्हाधिकारी यांच्या अहवालानंतरच सरकार लॉकडाउन करायचे की नाही हे ठरवत असते. जिल्हा प्रशासानाने अद्यापि लॉकडाउनबाबत अहवाल पाठवलेला नाही.

संग्राम जगताप, आमदार, नगर

 

लॉकडाउन पर्याय नाही

कोरोनामुळे सर्वांच्या मनात भितीचे वातावरण आहे. ही साखळी तुटली पाहिजे. परंतु लॉकडाउन हा काही त्यावरचा पर्याय नाही. नाही तर रात्रीचे लॉकडाउन सुरूच आहे. प्रशासन त्यांच्या पद्धतीने काम करीत आहे. लोकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळले पाहिजे. महापालिका सुस्त आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रूग्णांना चांगली सुविधा मिळत नाही. आठ आठदिवस लोकांचे रिपोर्ट आले नाही तर साखळी कशी तुटेल. ह्या लोकांनी अगोदर सुधारले पाहिजे.लॉकडाउनपेक्षा इतर पर्याय वापरा.

अनिल राठोड, माजी आमदार, शिवसेना, नगर.

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Politics in the lockdown of Ahmednagar