भाजपवाल्यांच्या पोटात तेच कंगणाच्या मुखात...मंत्री थोरातांची गद्दारांना चपराक

आनंद गायकवाड
Friday, 4 September 2020

कंगनाचा बोलविता धनी कोण आहे, हे उघड आहे. आपल्या राजकीय स्वार्थासाठी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन महाराष्ट्राच्या मातीशी गद्दारी केली आहे. अभिनेत्री कंगणा रानावतला काम, नाव, पैसा आणि प्रसिद्धी मिळवून दिलेली मुंबई आणि महाराष्ट्राची तुलना पाकव्याप्त काश्‍मिरशी करणे, हा कृतघ्नपणा आणि राज्यातील 13 कोटी मराठी जनतेचा अपमान आहे.

संगमनेर ः भारतीय जनता पक्षाच्या पोटातील गोष्ट काही दिवसांपासून अभिनेत्री कंगना रानावत हिच्या मुखातून आणि ट्‌वीटमधून बाहेर येत आहे. अभिनेत्री कंगनाला पुढे करून मुंबई पोलिस, मराठी माणूस आणि महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या द्रोह्यांना छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रातील जनता कधीच माफ करणार नाही, अशा शब्दांत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी टीका केली. 

पत्रकात मंत्री थोरात यांनी म्हटले आहे, की बिहार विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुंबई पोलिस आणि महाराष्ट्राच्या बदनामीचा नियोजनबद्ध कट कोणी रचला, याची माहिती महाराष्ट्रातील जनतेला आहे. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारविरुद्ध कारस्थाने रचणारे आता महाराष्ट्र आणि मराठी माणसांविरुद्ध कटकारस्थाने करीत आहेत.

कंगनाचा बोलविता धनी कोण आहे, हे उघड आहे. आपल्या राजकीय स्वार्थासाठी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन महाराष्ट्राच्या मातीशी गद्दारी केली आहे. अभिनेत्री कंगणा रानावतला काम, नाव, पैसा आणि प्रसिद्धी मिळवून दिलेली मुंबई आणि महाराष्ट्राची तुलना पाकव्याप्त काश्‍मिरशी करणे, हा कृतघ्नपणा आणि राज्यातील 13 कोटी मराठी जनतेचा अपमान आहे.

कंगणाने केलेल्या एकाही वक्तव्याचा भाजपाने निषेध केला नाही. त्यांचे मौन हेच त्यांचा पाठिंबा असल्याचे दाखवित आहे. अभिनेता सुशांतसिंगच्या आत्महत्येचा मुद्दाही राजकीय करून त्याचा लाभ उठविण्यासाठी महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावण्यापर्यंत या मंडळींची मजल गेल्याचे थोरात म्हणाले. 

महाराष्ट्रातील कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या पक्षांचे आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून ही मंडळी अस्वस्थ आहेत. हे सरकार कोणत्याही मार्गाने खाली खेचायचे, यासाठी मागील नऊ महिन्यांपासून त्यांनी सर्व उद्योग करून पाहिले. सुरवातीला राजभवनच्या आडून सरकार अस्थिर करण्याचे उद्योग केले, मात्र त्यात त्यांना यश आले नाही. कंगनासारख्या अभिनेत्रीला हाताशी धरून मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचे काम केले. भाजपला छत्रपती शिवाजी महाराज किंवा महाराष्ट्राच्या जनतेबद्दल प्रेम नाही. त्यांना फक्त राजकीय पोळी भाजायची आहे. मात्र, त्यात त्यांना कदापी यश येणार नाही, असे थोरात यांनी स्पष्ट केले आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Politics of Sushant Singh's death from BJP