वन विभागाच्या संगमनेर कार्यालयातील उपविभागीय अधिकारीपद रिक्त

आनंद गायकवाड
Friday, 27 November 2020

वनक्षेत्राची देखभाल करण्यासाठी सहा विभागात विभागल्या गेलेल्या कार्यक्षेत्राचे प्रमुख असलेले वनपरिक्षेत्र अधिकारी पद गेल्या एक जून 2020 पासून रिक्त.

संगमनेर (अहमदनगर) : वनविभागाच्या संगमनेर व अकोले या विस्तीर्ण तालुक्यातील वनक्षेत्राची देखभाल करण्यासाठी सहा विभागात विभागल्या गेलेल्या कार्यक्षेत्राचे प्रमुख असलेले वनपरिक्षेत्र अधिकारी पद गेल्या एक जून 2020 पासून रिक्त असल्याने या दोन्ही तालुक्याचा कारभार सध्या अतिरीक्त कार्यभार असलेले अधिकारी सांभाळीत आहेत.

संगमनेर येथे संगमनेर व अकोले तालुक्यातील वनक्षेत्राचा कारभार सांभाळण्यासाठी उपविभागीय वनाधिकारी कार्यालय आहे. या कार्यालयांतर्गत संगमनेर तालुक्यातील वनक्षेत्राचे तीन भाग तसेच अकोले तालुक्यातील राजूर, अकोले प्रादेशिक व अकोले रोहयो असे सहा विभाग मोडतात. या दोन्ही तालुक्यात वनविभागाच्या कार्यक्षेत्रात सुमारे 54 हजार 821 हेक्टर वनक्षेत्र आहे. या विभागात सुरक्षित अधिवासामुळे मोठ्या प्रमाणात बिबटे, तरस, कोल्हे, लांडगे, मोर, ससे, आदींचे अस्तित्व आहे.

यासाठी प्रत्येक विभागासाठी आवश्यक असलेल्या सहा वनक्षेत्रपाल पदांपैकी एक पद रिक्त असून, राजूरचा अतिरीक्त कार्यभार जे. डी. गोंदके यांच्याकडे आहे. उपविभागीय वनाधिकारी अनिल तोरडमल यांची मे अखेरीस बदली झाल्यानंतर एक जून पासून या पदाचा अतिरीक्त कार्यभार नाशिक विभागाचे जे. ए. झोले यांच्याकडे आहे. वनविभागाच्या 19 पैकी 16 पदे भरलेली असून, तीन जागा रिक्त आहेत. तसेच या सहा विभागासाठी 55 वनरक्षकांची आवश्यकता असली तरी प्रत्यक्षात केवळ 45 पदे भरलेली असून, 10 जागा रिक्त आहेत.

संगमनेरपेक्षा अकोले तालुक्यात निबीड, घनदाट वनक्षेत्र व आदिवासीबहुल भाग असल्याने वने तसेच वन्यप्राण्याचे चोरट्या शिकारी, व मानवापासून हानी होवू नयेसाठी संरक्षण, वनोपज व वनाची चोरटी तोड थाबवणे, नैसर्गिक व मानवी हस्तक्षेपामुळे लागणारे वणवे आदीच्या देखभालीसाठी मनुष्यबळाची आवश्यकता आहे. मात्र मुख्य अधिकाऱ्यांसह सुमारे 20 जागा रिक्त असल्याने, या सर्व कामांचा अतिरिक्त ताण उपलब्ध मनुष्यबळावर पडतो आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The post of Subdivisional Officer is vacant in the Sangamner office of the Forest Department