esakal | नगरच्या बाजार समितीत २० लाखांची वीजचोरी; गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

 वीजचोरी

नगरच्या बाजार समितीत २० लाखांची वीजचोरी; गुन्हा दाखल

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

नगर तालुका : महावितरणच्या भरारी पथकाने नगरच्या बाजार समितीतील भाजीपाला बाजारात असलेल्या गाळ्यावर छापा घालून २० लाखांची वीजचोरी उघडकीस आणली. याप्रकरणी शुक्रवारी दुपारी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.


महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रदीप सावंत यांच्या नेतृत्वाखालील पथकातील कनिष्ठ अभियंता आशिष नावकार, जे. पी. फटांगडे, एस. बी. बिटनर, ए. सी. बोडखे, यशवंत वेदपाठक यांच्या पथकाने १४ सप्टेंबर रोजी दुपारी बाजार समितीतील मच्छिंद्र रामभाऊ ताठे यांच्या गाळ्यातील मीटरची तपासणी केली होती. या गाळ्याचा वापर संतोष राजू ढवळे करीत असल्याचे आढळून आले.

हेही वाचा: संगमनेर तालुक्यात २७ गावे प्रतिबंधित क्षेत्र घोषित!


गाळ्यातील मीटर बंद होते. त्यामुळे ते तपासणीसाठी मीटर चाचणी कक्षाकडे पाठविण्यात आले होते. मीटरची १७ सप्टेंबर रोजी दुपारी ढवळे यांच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत तपासणी केली असता, मीटरच्या खालील बाजूस टर्मिनलजवळ एक छिद्र होते. मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी केली जात असल्याचे आढळून आले. ही वीजचोरी ऑगस्ट २०१७पासून सुरू असून, त्याची युनिट संख्या ९४ हजार ७३४ एवढी होते. या वीजचोरीची एकूण किंमत १९ लाख ६५ हजार ९२० होत आहे. तडजोडीची रक्कम ४५ हजार आहे. ही रक्कम भरण्यासाठी ढवळे यांना आठवडाभराचा कालावधी दिला होता, मात्र त्यांनी या कालावधीत वीजचोरीसह तडजोडीची रक्कम न भरल्यामुळे भरारी पथकाचे प्रमुख प्रदीप सावंत यांनी शुक्रवारी (ता. २४) दुपारी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून गाळामालक मच्छिंद्र रामभाऊ ताठे व वापरकर्ता संतोष राजू ढवळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा: शेतकऱ्यांनो, सोयाबीन विक्रीची घाई करू नका! व्यापाऱ्यांचे आवाहन

loading image
go to top