esakal | मंत्री तनपुरेंकडून महावितरणच्या कारभाराचे वाभाडे, दिला कारवाईचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

Minister Prajakt Tanpure

मंत्री तनपुरेंकडून महावितरणच्या कारभाराचे वाभाडे, दिला कारवाईचा इशारा

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

श्रीगोंदे (जि. अहमदनगर) : अनेक महिने मागणी करूनही, बिघाड झालेले रोहित्र बदलून मिळत नाही. अधिकारी आणि कर्मचारी शेतकऱ्यांकडून मोठ्या रकमेची मागणी करतात. रिक्त पदांची समस्या असतानाच काही जण अनेक वर्षे जागीच बस्तान ठोकून आहेत, अशा आरोपांच्या फैरी सामान्य लोक झाडत असल्याने, आपल्याच विभागातील कारभार चव्हाट्यावर येत असल्याने हताश झालेल्या ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी, तुमच्या अशा वागण्याने ऊर्जा खात्याची मान शरमेने खाली जात असेल तर ही बाब गंभीर आहे. दोन महिन्यांत कारभारात सुधारणा करा, अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशारा दिला.

पंचायत समिती सभागृहात ऊर्जा व आदिवासी खात्याशी निगडित प्रश्नांवर आज आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. आमदार बबनराव पाचपुते, राष्ट्रवादीचे नेते घनश्याम शेलार, राजेंद्र नागवडे, प्रांताधिकारी स्वाती दाभाडे, तहसीलदार मिलिंद कुलथे, पोलिस निरीक्षक रामराव ढिकले व नंदकुमार दुधाळ, सभापती गीतांजली पाडळे, हरिदास शिर्के उपस्थित होते.
आदिवासी विकास खात्याकडून खावटी वाटप करण्यात आले. त्यावर तनपुरे म्हणाले, की आदिवासी समाजाच्या तुलनेत तालुक्यात खावटीवाटप कमी असून, आदिवासी लोकांना योजनेचा लाभ मिळत नसेल तर ही बाब योग्य नाही. कॅम्प आयोजित करून तेथे दाखले देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. राजेंद्र म्हस्के यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर, उपस्थित अनेक नागरिकांनी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारींचा पाढा वाचला. टाकळी कडेवळीत येथील शेतकऱ्यांचे रोहित्र सहा महिन्यांपूर्वी जळाले.


वीजबिल भरूनही ते बदलून मिळाले नसल्याचा मुद्दा मांडला. त्यावर अधिकाऱ्यांनी नियम दाखवत स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तनपुरे यांनी ही बाब गांभीर्याने घेत, मला कारणे सांगू नका, उद्याच्या उद्या संबंधित शेतकऱ्यांचे रोहित्रे बसवून तसा अहवाल आपणास पाठविण्याचा आदेश दिला. सुरोडी येथील तरुण शेतकऱ्याने, रोहित्र बसविण्यासाठी वीज वितरणच्या अधिकाऱ्याने ७० हजार रुपये घेतल्याचा आरोप केला. खोटे बोलत असेल तर माझी कुठल्याही अग्निपरीक्षेला सामोरे जाण्याची तयारी आहे, असे त्याने सांगताच तनपुरे अवाक्‌ झाले.
पाचपुते म्हणाले, की रोहित्रे बसविण्यासाठी पैसे द्यावे लागतात. शेतकऱ्यांची पिळवणूक होते. वीज वितरणकडून जाणीवपूर्वक रोहित्रे उशिरा दिली जातात. ही बाब गंभीर असून, लोकांची पिळवणूक थांबली पाहिजे.

हेही वाचा: अहमदनगर : भोसले-पठारे टोळीतील 11 जणांवर मोक्काची कारवाई

‘सकाळ’च्या बातमीची दखल, मंत्र्यांचे आदेश

शेलार म्हणाले, की मढेवडगाव येथे जळालेले रोहित्र बदलून देताना पुन्हा जळालेले रोहित्रच देण्यात आले. हा बोगस बिले काढण्याचा प्रकार असून, संबंधित एजन्सीची चौकशी व्हावी. मढेवडगाव, चिंभळे भागात व्यावसायिकांचा विजेअभावी कोंडमारा होत आहे. एक्स्प्रेस फीडर बसविण्याची मागणी आहे, मात्र वीज वितरणचे अधिकारी जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत आहेत. त्यावर तनपुरे यांनी, जळालेले रोहित्रे देणाऱ्या एजन्सीची चौकशी करू, असे सांगत एक्स्प्रेस फीडर बसविण्याबाबत आदेश दिला.

हेही वाचा: अहमदनगर : 13 वर्षांच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार, गुन्हा दाखल

loading image
go to top