प्रसाद शुगरचा डिस्टलरी, वीजनिर्मिती प्रकल्प लवकरच

सकाळ वृत्तसेवा
Monday, 12 October 2020

आज (सोमवारी) नगरविकास व ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते प्रसाद शुगरच्या गव्हाणीत उसाची मोळी टाकून, सन 2020-21 या वर्षाच्या नवव्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला.

राहुरी : प्रसाद शुगर अँड अलाईड ॲग्रो प्रॉडक्टस् लि., वांबोरी या साखर कारखान्याचा तीस केएलपीडी क्षमतेचा आसवनी प्रकल्प येत्या डिसेंबर महिन्यात; तर, 23 मेगावॉट क्षमतेचा सहवीज निर्मिती प्रकल्प 2021 वर्षात कार्यान्वित करण्याचा मानस आहे. यंदा सात लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. असे कारखान्याचे कार्यकारी संचालक सुशीलकुमार देशमुख यांनी सांगितले.

आज (सोमवारी) नगरविकास व ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते प्रसाद शुगरच्या गव्हाणीत उसाची मोळी टाकून, सन 2020-21 या वर्षाच्या नवव्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी देशमुख बोलत होते. ज्येष्ठ संचालक सुरेश बाफना, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, नितीन बाफना, प्रकाश देठे, विजय माळवदे, चीफ जनरल मॅनेजर विकास आभाळे, जनरल मॅनेजर (प्रक्रिया) ज्ञानेश्वर रसाळ, जनरल मॅनेजर (शेतकी) गोरक्षनाथ ढोबळे, वर्क्स मॅनेजर संजय म्हस्के उपस्थित होते.

देशमुख म्हणाले, "यंदा तालुक्यात सरासरीच्या दुप्पट पाऊस झाला आहे. कालपासून मॉन्सूनचा परतीचा पाऊस तालुक्यात सक्रिय झाला आहे. त्यामुळे, उसाच्या प्लॉटमध्ये पाणी भरलेले आहे. ऊस तोडणी यंत्रणा सज्ज आहे. परंतु, हंगामाच्या सुरुवातीला पावसामुळे ऊस तोडणीसाठी समस्या उद्भवणार आहेत.

यंदा तालुक्यात बारा लाख मेट्रिक टन ऊस गाळपासाठी उभा आहे. शेतकऱ्यांनी कारखान्याकडे नोंदविलेल्या सर्व उसाचे गाळप केले जाईल. दररोज साडेचार हजार मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचे नियोजन आहे."

"राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याच्या आसवनी प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सहवीज निर्मिती प्रकल्पाचे काम केले सुरू आहे. कारखान्यात साखरेबरोबरच उपपदार्थ निर्मिती प्रकल्प लवकरच कार्यान्वित होतील." असेही देशमुख यांनी सांगितले. अहमदनगर

संपादन - अशोक निंबाळकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prasad Sugar's distillery, power generation project soon