esakal | प्रशांत पाटील गडाखांनी फाडला अर्णब-कंगणाचा बुरखा, मराठी अस्मिता हरवली काय?
sakal

बोलून बातमी शोधा

Prashant Patil Gadakh's criticism of Arnab Goswami, Kangana

कंगनाचे मुंबईला "पाकव्याप्त काश्‍मीर' संबोधणे, हा तर महाराष्ट्राचा घोर अपमान आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत हौतात्म्य पत्करलेल्या 107 जणांची ही घोर विटंबना आहे. भाजपलाही  प्रशांत पाटील गडाख यांनी शालजोडीतील टोले लगावले.

प्रशांत पाटील गडाखांनी फाडला अर्णब-कंगणाचा बुरखा, मराठी अस्मिता हरवली काय?

sakal_logo
By
डॉ. बाळ ज. बोठे पाटील

नगर ः महाराष्ट्राची परंपरा छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. त्याला शाहू- फुले- आंबेडकरांचा वारसा आहे. तोच आपल्याला तरुण पिढीकडे सोपवावा लागेल. सुशांत, कंगना, रिया, अर्णब हे त्यांचे आदर्श असू शकत नाहीत. राज्यघटनेनुसार, या देशाच्या कोणत्याही राज्यात आपल्याला समानतेने जगण्याचा हक्क आहे; पण हे करताना आपण तिथल्याच भूमिपुत्रांना "हे तुमच्या बापाचे नाही' म्हणून आव्हान देत असू, तर त्यातून "असंवैधानिक' प्रतिक्रिया उमटणारच..!

पत्रकार अर्णब गोस्वामीचे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा शिवराळ भाषेत एकेरी उल्लेख करणे असो, की गृहमंत्र्यांना, "सुन अनिल देशमुख, कौन हैं तू?' या भाषेत एका छोट्याशा स्टुडिओत बसून टीव्हीवर बोलणे कोणत्याही मापदंडानुसार सहन करण्याजोगे नाही. हा त्या पदावरील व्यक्तीचाच नव्हे, तर त्या घटनात्मक पदाचा अपमान आहे. राजकीय विरोधापायी काही जणांना यातून आनंदाच्या उकळ्या फुटत असल्या, तरी उद्या "काळ सोकावला तर..' असे म्हणत कपाळावर हात मारून घेण्याची वेळ सगळ्यांवर येईल, अशी भीती यशवंत सामाजिक प्रतिष्ठानाचे अध्यक्ष व युवा नेते प्रशांत पाटील गडाख यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली. 

सध्याच्या सामाजिक, राजकीय, औद्योगिक यांसह विविध विषयांवर प्रशांत पाटील गडाख यांनी मनमोकळा संवाद साधला. ते म्हणाले, ""कंगनाला महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार आहेच आणि तिच्या संरक्षणाची जबाबदारी आजवर राज्य सरकारनेच पार पाडली. असे असताना तिने महाराष्ट्र सरकार व मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखविला आणि केंद्राने तिला सुरक्षा देऊ केल्यावर मात्र देशाचे अभिनंदन केले. नेमकं देशाचं अभिनंदन करून ती भारतापासून महाराष्ट्र वेगळा धरते का, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. महाराष्ट्राबाहेरून येथे येऊन व्यावसायिक यश आणि नावलौकिक मिळविलेल्यांची संख्या मोठी आहे. इतरही राज्यांतून अनेक जण इथे आले. त्यांनी महाराष्ट्र व मुंबई आपली कर्मभूमी मानली व त्याचा ते अभिमानही बाळगतात; पण त्यातील काही फुटकळ लोकांकडून महाराष्ट्राचेच उलटे पांग फेडण्याची प्रथा नवी नाही. कंगना आणि अर्णब हे त्याच यादीतील नवे मोहरे आहेत.'' 

..ही तर "त्या' हुतात्म्यांची घोर विटंबना 
वाद वाढल्यावर "मी शिवाजी महाराज व झाशीच्या राणीवर चित्रपट केला, अशी उठवळ जवळीक कंगनाने दाखविणे किंवा "मी शिवरायांचा मावळा आहे आणि कंगना झाशीची राणी आहे..' असे म्हणणारे आपलेच स्वकीय आहेत. व्यवसाय आणि सामाजिक जाण, याची मुद्दामहून केली जाणारी गफलत तरुणांना उबग आणणारी आहे. कंगनाने केलेले चित्रपट हे तिने समाजकार्य म्हणून केलेले नाहीत. त्या बदल्यात तिने बक्कळ पैसे कमावले आहेत. कंगनाचे मुंबईला "पाकव्याप्त काश्‍मीर' संबोधणे, हा तर महाराष्ट्राचा घोर अपमान आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत हौतात्म्य पत्करलेल्या 107 जणांची ही घोर विटंबना आहे, असे प्रशांत पाटील यांनी स्पष्ट केले. 

मुख्यमंत्रिपदाच्या अवमानाची गुर्मी नेमकी कुठून आली? 
कंगनाच्या तोंडी आलेली (की घातलेली) महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाविषयीची "अरे-तुरे'ची भाषा सभ्यतेच्या सगळ्या मर्यादा ओलांडून गेली आहे. मुख्यमंत्रिपदाचा सरळ सरळ अवमान करण्याची ही गुर्मी आली कुठून, असा सवाल करून प्रशांत पाटील गडाख म्हणाले, ""मुख्यमंत्रिपद हे एखाद्या पक्षाचं नसतं. ते महाराष्ट्राचं असतं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा अवमान, हा संपूर्ण महाराष्ट्राचा अवमान. छत्रपती शिवाजी महाराजांचा "गनिमी कावा' महाराष्ट्राच्या नसानसात भिनला आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. महाराष्ट्राची देशभक्ती वादातीत आहे. महाराष्ट्राचे कोणत्याही क्षेत्रातील गेली अनेक दशके असणारे योगदानही निर्विवाद आहे. महाराष्ट्राची ओळख पुरोगामी विचारांची आहे. तो विचार पुढे घेऊन जाणारे नरेंद्र दाभोलकर व गोविंद पानसरे यांची तर उघडपणे निर्घृण हत्या झाली. कंगना, अर्णब आणि सध्या आक्रोशाचा रतीब घालणाऱ्या काही हिंदी वृत्तवाहिन्या त्या वेळी कुठे होत्या. तब्बल पाच वर्षे होत आलेल्या सीबीआय तपासावर ते आजही काहीच का बोलत नाहीत?'' 

"त्यांचं' काळं जग बाहेर काढलं, तर काय होईल? 
कुठलंही सरकार येतं आणि जातं; पण अचानक महाराष्ट्र व मुंबई "पाकव्याप्त' वाटणं आणि "ही मुंबई कोणाच्या बापाची नाही' याला काही "पोपटां'नी देशभर प्रसिद्धी देणं, म्हणजे ही अभिनेत्री नव्हे, तर देशातली एक विचारवंत आहे असं भासवलं जाणं, ही एक शोकांतिकाच आहे. खरं तर प्रत्येक व्यक्तीची चौकशी केली, तर काही ना काही "काळा डाग' असतोच. आता चाललेल्या या बॉलिवूडच्या चौकशांमधून बाहेर येणारी विकृती ही जगाच्या पाठीवर फक्त मुंबई आणि महाराष्ट्रातच घडते, असं विद्रूपीकरण करून त्याची कलमं जणू काही महाराष्ट्रावर लावली जात आहेत. त्याद्वारे मुंबईची प्रतिमा मलिन केली जात आहे. बिहार, उत्तर प्रदेश व इतर राज्ये यांचं काळं जग जर मनापासून बाहेर काढायचं ठरवलं, तर काय होईल? पण मराठी माणूस अशी विकृत भावना कधीच बाळगत नाही, असे गडाख यांनी स्पष्ट केले. 

केंद्राच्या धोरणानुसार राज्यात सर्वाधिक बेरोजगारी 
केंद्र सरकारच्या काही कथित अनिष्ट बाबींवरही प्रशांत पाटील यांनी कोरडे ओढले. ते म्हणाले, ""मुंबईतील उद्योग कार्यालय दुसऱ्या राज्यात नेणे, तसेच मुंबई ते अहमदाबाद "बुलेट ट्रेन'मागेही कुटिल राजकारण आहे. केंद्र सरकारकडे जमा होणारी महसुली, जीएसटी प्राप्ती व इतर करांचा खूप मोठा हिस्सा महाराष्ट्रातून जातो. त्याचा किती टक्के परतावा आपल्याला मिळतो, हे पाहण्याचा हक्क आपल्याला नाही का? त्यावर आपला काही अधिकार आहे का? आज तो आपल्याला मिळत नाही. अर्थव्यवस्थेचा पूर्ण बोजवारा उडालाय.

महाराष्ट्रात नवे उद्योग यायला आडकाठी आणली जाते. आहे ते उद्योग दुसरीकडे हलविले जातात. त्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या. उद्योगधंदे बुडाले. शेतीव्यवसाय कायम अवहेलना सहन करीत आहे. कृषी, सहकार, उद्योग, शिक्षण आदी बाबींमध्ये महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांच्या धोरणातून व त्यांच्या जोडीला त्या-त्या वेळच्या कर्तबगार पिढीच्या कष्टातून महाराष्ट्र सर्वांगाने समृद्ध झाला; मात्र या महाराष्ट्रालाच बदनाम केलं जातंय. सर्वाधिक कर जमा करणारा महाराष्ट्र समान वाटपानुसार, इतर राज्यांच्या प्रगतीलाही हातभार लावत आहे. केंद्राच्या धोरणानुसार महाराष्ट्रात आज सर्वाधिक बेरोजगारी वाढते आहे. तरुणांमध्ये भविष्यात त्याचा उद्रेक झाला, तर आश्‍चर्य वाटायला नको.'' 

तरुणच ठरवतील अस्मिता अन्‌ अस्तित्व 
तरुणांना सतत महाराष्ट्रापासून मुंबई तुटण्याची भीती दाखविली जाते. हे सगळं डोळसपणे पाहत असताना, दीर्घ काळ सहन करीत असताना जर महाराष्ट्रातील तरुण, "चला, आपण वेगळे होऊ', "मुंबई कुणाच्या नाही, तर आपल्याच बापाची अन्‌ हक्काची आहे. तिच्यासकट आपला महाराष्ट्र आपणच वेगळा घडवून दाखवू,' असा "आत्मनिर्भर' विचार करायला लागला, तर त्यात दोष कुणाचा असेल? काश्‍मीर, पंजाब, तमिळनाडू, ईशान्येतील राज्यांनी वेळोवेळी विलगीकरणाची ही भाषा केली असली, तरी महाराष्ट्राने कधीच असा विचार केला नाही. अर्णब व कंगना अशा फुटकळ उपऱ्यांनी महाराष्ट्राला उगाच शहाणपण शिकवू नये. महाराष्ट्रातील अस्मिता व अस्तित्व कसे टिकवायचे, हे इथले तरुणच ठरवतील, असे मत प्रशांत पाटील यांनी व्यक्त केले. 

किती काळ हा तात्त्विक पुळचटपणा अन्‌ लाळघोटेपणा? 
महाराष्ट्रासह संपूर्ण देश आरोग्यासंदर्भात अस्मानी संकटातून जाताना हे कुटिल व सुलतानी संकट मुद्दामहून तयार केलं जातंय का, असा प्रश्न पडतो. अशा घटनांमुळे महाराष्ट्रातील तरुण मनातून अस्वस्थ आहे. त्याला हे सगळे बारकावे कळत आहेत. राजकारण करणाऱ्यांना हा तरुण मोबाईल व सोशल मीडियात गुंतला असल्याचे वाटणे हा तात्कालिक भ्रम आहे. लवकरच हा तरुण महाराष्ट्राच्या बाजूने उभा राहिलेला असेल. काश्मीर, पंजाब, हरियाना, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, पश्‍चिम बंगाल, केरळ आणि अन्य सर्वच राज्यांमध्ये प्रादेशिक अस्मिता चालते. तिथे कंगना व अर्णब या भाषेत बोलू शकत नाहीत; मग महाराष्ट्राने किती काळ हा तात्त्विक पुळचटपणा अन्‌ लाळघोटेपणा देशापुढे घोळायचा, असा सवाल प्रशांत पाटील गडाख यांनी उपस्थित केला. 

नाही तर गमावलेला दिवस 
आपल्याला पाहावा लागेल! 

मुंबईतील वाढत्या अनिष्ट बाबींवर प्रशांत पाटील गडाख यांनी प्रहार केले. इतके सर्व काही होऊनही मराठी माणूस गाफील असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. ते म्हणाले, ""गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पैसे लावले की जॅकपॉट, असा दृष्टिकोन खूपच वाढू लागला आहे. मुंबई कोणाला तरी हवी आहे का, असं वाटण्याजोगी परिस्थिती तयार होत आहे. मुंबईविषयी वाटणारी हाव, या सगळ्या घटनांमधून पुढे येते आहे, ही बाब चिंताजनक आहे. या सगळ्या गोष्टींकडे मराठी माणसाने डोळे उघडून पाहायला हवं. त्यासाठीच या संवादाचा खटाटोप केला आहे. मराठी माणसाने या सर्व बाबींकडे वेळीच पाहिले नाही, तर मुंबई गमावलेला दिवस आपल्याला पाहावा लागेल.'' 

संपादन - अशोक निंबाळकर