दुधात पडली साखर ः दहा दिवसांत वाढले आठ रूपयांनी दर

The price of milk increased by eight rupees in ten days
The price of milk increased by eight rupees in ten days

शिर्डी ः दूधउत्पादकांसाठी ही गोड बातमी आहे. गेल्या दहा दिवसांत दूध खरेदीचे दर प्रतिलिटर तीस रूपयांवर जाऊन पोचले.

गेल्या दहा महिन्यांतील हा सर्वाधिक दर आहे. त्यामुळे दुध उत्पादकांना दिलासा मिळला आहे. दूध भुकटीचे दर व मागणी वाढल्याने ही दरवाढ सुरू आहे.

लाॅकडाऊनच्या काळात उत्पादकांना अठरा ते वीस रूपये प्रतिलिटर दुध विकावे लागले. दूध भावातील हे चढ-उतार उत्पादकांच्या मुळावर येतात. भाव पडले की गोठ्यातील गायी कमी कराव्या लागतात. भाव वाढले की नव्याने गायी खरेदी करण्याची ऐपत नसते. वर्षभर परवडणारा शाश्वत भाव मिळत नसल्याने त्यांची परवड होते. 

आता दुधाचे भाव वाढले. मात्र, त्यापूर्वीच सामान्य उत्पादकांच्या गोठ्यातील दुभत्या जनावरांची संख्या कमी झाल्याचे चित्र सध्या पहायला मिळते आहे. 

दूध भुकटीची मागणी आणि दर वाढले की दुधाचे खरेदी दरदेखील वाढतात असा अनुभव आहे. दुध भुकटी तयार करणारे उद्योजक एका अर्थाने राज्यातील दुध खरेदीचे दर ठरवितात, असे म्हटले तर वावगे होणार नाही. लाॅकडाऊनच्या काळात दुधाच्या मागणीत मोठी घट झाली. त्यामुळे वर्षभरापूर्वी प्रतिलिटर 34 रूपये दराने विकले जाणारे शेतक-याचे दूध अठरा ते वीस रूपये प्रतिलिटर दराने विकण्याची वेळ आली.

अर्थात या कठीण काळात या दुधाची भुकटी तयार करण्यात आल्याने उत्पादित होणारे दूध किमान विकले तरी गेले. 
मात्र भाव पडल्याने उत्पादकांचे अर्थकारण पुरते बिघडले, व्यवसाय तोट्यात गेला. नाईलाजाने गोठ्यातील गायी कमी करण्यावाचून पर्याय राहीला नाही.

ब-याच उत्पादकांनी त्याकाळात पशूखाद्यावर होणारा खर्च बंद केला. दुधाचे उत्पादन झपाट्याने घटले. लाॅकडाऊन हटले, कोविडच्या संसर्गाचा फैलाव कमी झाला. तसा दुधाची मागणी वाढली. त्याच बरोबर आईसक्रिम उद्योगाकडून दुधभुकटीची मागणीदेखील वाढली. त्यामुळे सध्या दुध भुकटीचे भाव प्रतिकिलो 230 रूपये वर जाऊन पोचले आहेत. तर अमुलसारख्या नामांकीत ब्रॅण्डचे दर प्रतिकिलो 250 रूपये प्रतिकिलोपर्यंत वाढले आहेत. 

सध्या महागलेली दूध भुकटी मात्र प्रतिलिटर अठरा ते वीस रूपये प्रतिलिटर अशा स्वस्त दराने तयार केलेल्या दुधापासून तयार केलेली आहे. दूध स्वस्त मिळाल्याने भुकटी उत्पादकांना फायदा झाला. मात्र, स्वस्त दूध विकावे लागल्याने सामान्य उत्पादकांचे अर्थकारण विस्कटून गेले.

आईसक्रिम उद्योगाकडून दुधभुकटीला सर्वाधिक मागणी असते. मागील वर्षी हा उद्योगही अडचणीत सापडला होता. यंदा चांगला व्यवसाय होणार असल्याने दुधभुकटीची मागणी वाढली आहे. त्यामुळे दुधाचे खरेदी दरदेखील वाढले आहेत. 

सहकारी दुध संघावर सरकार नियंत्रण ठेवते. खासगी उद्योजकांवर नियंत्रण नाही. नगर जिल्ह्यात दररोज 25 लाख लिटर दुध तयार होते. त्यात खासगी उद्योगाचा वाटा अठरा लाख लिटरचा आहे. त्यांच्यावर नियंत्रण नसल्याने दुधाचा भाव चढ उतार होतात. त्यात उत्पादक भरडले जातात.

राजेश परजणे (अध्यक्ष, गोदावरी दुधसंघ, कोपरगाव)

दूध उत्पादकांना वर्षभर परवडेल असा दर देण्यात आम्ही ब-यापैकी यश मिळविले. या वर्षभरात आम्ही त्याबाबत आणखी प्रगती करू. दुध दरातील चढ उतार करण्याची शक्ती सामान्य उत्पादकांत नसते, हे लक्षात घ्यायला हवे.

- सुनील सदाफळ ( कार्यकारी संचालक, पंचकृष्ण डेअरी राहाता) 

यंदा अतिवृष्टीमुळे वैरणीची पिकेदेखील नष्ट झाली. दुधाचे भाव पडल्याने त्याकाळात राज्यातील गोधन मोठ्या प्रमाणावर विकले गेले. त्यामुळे दुधाचे उत्पादन घटले. दुध भुकटीला मागणी वाढल्याने सध्या दुधाचे भाव प्रतिलिटर तिस रूपयांवर गेले. त्याच वेळी दुधाचे उत्पादन देखील वाढू लागले आहे. 
-चंद्रकांत गाढवे (कार्यकारी संचालक, गोदावरी दुध संघ कोपरगाव, अहमदनगर )

संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com