राजेंद्र नागवडे यांच्या स्वकियांनी वाढविल्या अडचणी

संजय आ. काटे
Thursday, 24 December 2020

शिवाजीराव नागवडे यांनी त्यांचे पूत्र राजेंद्र यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली. बापूंनंतर कारखान्यासोबतच त्यांच्या गटाचे राजकारण तेच सांभाळतात. पाचपुते यांच्यासोबतचे राजकीय वैर संपविण्यासाठी मध्यंतरी राजेंद्र नागवडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

श्रीगोंदे : खासगी साखर कारखान्याला सहकारी तत्वावर आणून दिवंगत नेते शिवाजीराव नागवडे यांनी श्रीगोंदे सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे प्रंपंच फुलविले. त्यांच्यानंतर कारखान्यातील संचालक मंडळात धुसफूस सुरू झाली आहे.

उपाध्यक्षपदाचा राजीनामा देत, केशव मगर यांनी बापूंचे पूत्र, कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या कारभाराच्या चिंधड्या उडविणारी वक्तव्ये केली. आगामी निवडणुकीत वेळीच सावरले नाही, तर नागवडे यांच्यासमोर स्वकियांची आव्हाने उभी ठाकणार आहेत. 

तालुक्‍यात सहकारी साखर कारखानदारी उभी करून, ती यशस्वीपणे टिकविण्यासाठी शिवाजीराव नागवडे यांनी मोठा संघर्ष केला. राजकीय विरोधक आमदार बबनराव पाचपुते यांची तालुक्‍याच्या राजकारणावर मोठी पकड असतानाही, अपवाद वगळता त्यांना कारखान्याची सत्ता मिळविण्यात यश आले नाही. त्यावरूनच नागवडे यांची सहकारावरची पकड लक्षात येते.

हेही वाचा - बापरे, नगरमध्ये इंग्लंडहून आलेत अकराजण

शिवाजीराव नागवडे यांनी त्यांचे पूत्र राजेंद्र यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली. बापूंनंतर कारखान्यासोबतच त्यांच्या गटाचे राजकारण तेच सांभाळतात. पाचपुते यांच्यासोबतचे राजकीय वैर संपविण्यासाठी मध्यंतरी राजेंद्र नागवडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, त्यांचे कार्यकर्ते पाचपुते यांच्याशी जवळीक करण्यास तयार नाहीत. त्यामुळे नागवडे यांनीही पाचपुते यांच्यापासून चार हात अंतर राखल्याचे दिसते. 

दरम्यान, कारखान्याचे उपाध्यक्ष मगर यांनी राजेंद्र नागवडे यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप करीत राजीनामा दिला. काही महिन्यांवर कारखान्याची निवडणूक आली असताना, आता स्वकीयांकडूनच विरोध सुरू झाल्याने राजकारण तापले आहे. नागवडे यांच्यासाठी सर्वात अडचणीची बाब, म्हणजे मगर यांच्यासोबत असणारी सगळे प्रमुख नेते हे नागवडे यांच्याच गटाचे आहेत. त्यामुळे कारखाना निवडणुकीत त्यांना आव्हान मिळू शकते.

कारखाना निवडणुकीत पाचपुते हे नागवडे यांच्याविरोधात पॅनेल करतील, याविषयी शंका आहे. मात्र, आता त्यांना मगर व त्यांना मानणाऱ्या मंडळीचे आयते कोलीत मिळणार असल्याने राजेंद्र नागवडे यांना खिंडीत गाठण्यासाठी त्यांच्या विरोधकांची मोट बांधणी होऊ शकते. त्यामुळे स्वकियांची नाराजी दूर करून कारखान्याना निवडणुकीत शक्ती खर्च करण्याची वेळ येणार नाही, याची दक्षता नागवडे यांना घ्यावी लागणार आहे. 

अहमदनगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Problems exacerbated by Rajendra Nagwade's own