आनंदवनात लग्नसोहळा, वडाच्या साक्षीने घेतली सप्तपदी

राजेंद्र सावंत
Sunday, 10 January 2021

मांडवे येथील वन विभागाच्या जागेत संदीप राठोड व त्यांच्या सहकाऱ्यांनी लोकसहभागातून हे आनंदवन विकसीत केले आहे. आनंदवनातील पुष्प-लतांनी या जोडप्याचे स्वागत केले.

पाथर्डी : घरच्यांच्या समाधानासाठी धार्मिक पद्धतीने विवाह केला. मात्र, मनातील निसर्गविवाहाची इच्छा स्वस्थ बसू देत नव्हती. अखेर विचारांचा विजय झाला. नववधू-वराने थेट आनंदवन (मांडवे, ता. पाथर्डी) गाठले.

निसर्गाच्या सानिध्यात दोघांनी वडाभोवती सप्तपदी घेऊन सहजीवनाला प्रांरभ केला. मांडवे येथील प्रा. प्रमोद पवार यांनी 8 जानेवारीला शुभांगी यांच्यासोबत केलेला हा आनंद सोहळा निसर्गप्रेमींनी "याची देही, याची डोळा' अनुभवला. 

हेही वाचा - मोबाईलवरील मॅपने केला घात, पुणेकर गेले धरणात वाहून

मांडवे येथील प्रमोद पवार हे गोव्यात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. पाथर्डी येथील शुभांगी यांच्याशी त्यांचा विवाह ठरला. प्रमोद हे निसर्गप्रेमी असल्याने निसर्गाच्या साक्षीने, मांडवे येथील आनंदवनात विवाह व्हावा, अशी त्यांची इच्छा होती. मात्र, घरचे धार्मिक व रितीरिवाजाप्रमाणे विवाह करण्याच्या बाजूने होते. अखेर पाथर्डीत धार्मिक पद्धतीने हे जोडपे विवाहबद्ध झाले. नंतर नववधू-वरांनी थेट आनंदवन गाठले. 

मांडवे येथील वन विभागाच्या जागेत संदीप राठोड व त्यांच्या सहकाऱ्यांनी लोकसहभागातून हे आनंदवन विकसीत केले आहे. आनंदवनातील पुष्प-लतांनी या जोडप्याचे स्वागत केले. वृक्षवेली, फळे-फुले, वन्यप्राण्यांच्या साक्षीने व पक्ष्यांच्या किलबिलाटात प्रमोद व शुभांगी यांनी पुन्हा एकदा वडाभोवती सप्तपदी घेतली. निसर्गाला साक्षी ठेवून एकमेकांना जन्मभर साथ देण्याच्या आणाभाका घेतल्या. अहमदनगर

 
आम्ही रानावनातील माणसं. शिक्षणामुळे सिमेंटच्या जंगलात पोचलो. मात्र, माझा विवाह निसर्गाच्या सानिध्यात व्हावा, अशी इच्छा होती. नातेवाईक व जन्मदात्यांच्या समाधानासाठी काही गोष्टी कराव्या लागतात. मात्र, आनंदवनातील विवाहसोहळ्यामुळे आनंद झाला. 
- प्रमोद पवार, मांडवे, ता. पाथर्डी  अहमदनगर

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Professor's unique wedding ceremony in Pathardi