esakal | साईबाबांच्या शिर्डीची तीस कोटी रुपयांची कहाणी; ओल्या कचऱ्यापासून खत करणारा प्रकल्प ठरतोय दिशादर्शक
sakal

बोलून बातमी शोधा

A project set up to make compost from wet waste

शिर्डी नगरपंचायतीला स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत दोन वेळा प्रत्येकी पंधरा कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले.

साईबाबांच्या शिर्डीची तीस कोटी रुपयांची कहाणी; ओल्या कचऱ्यापासून खत करणारा प्रकल्प ठरतोय दिशादर्शक

sakal_logo
By
सतीश वैजापूरकर

शिर्डी (अहमदनगर) : शिर्डी नगरपंचायतीला स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत दोन वेळा प्रत्येकी पंधरा कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले. शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाणीवपूर्वक घेतलेला पुढाकार आणि साईसंस्थानने पुढे केलेला मदतीचा हात, यामुळे ही किमया घडली. पाच वर्षांपूर्वी कचराकोंडीने हैराण झालेल्या बाबांच्या शिर्डीने आता स्वच्छ शहर म्हणून संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले. "शिर्डी पॅटर्न' राज्याला दिशादर्शक ठरला आहे. 

साईसंस्थान नगरपंचायतीला शहरस्वच्छतेसाठी दरमहा बेचाळीस लाख रुपये देते. त्यातून एका कंपनीला ठेका देऊन शहराची स्वच्छता केली जाते. त्यामुळे स्वच्छतेच्या बाबतीत शिर्डीचा लौकिक देशभर झाला. साईसंस्थानचा साडेबारा कोटी रुपयांचा निधी शहरस्वच्छतेवर खर्च झाला. नगरपंचायतीला राज्य सरकारकडून स्वच्छ सर्वेक्षणाच्या बक्षिसापोटी तीस कोटी रुपये मिळाले. खर्च झाला त्याहून दुप्पट पैसे शहरस्वच्छतेसाठी राज्य सरकारकडून मिळाले. 

हेही वाचा : बेकायदा वाळूउपसा बंद करण्यासाठी श्रींगोद्यात राष्ट्रवादी उतरणार रस्त्यावर
आमदार विखे पाटील यांनी पुढाकार घेऊन निधी मिळविला. त्यातून आठ वर्षांपूर्वी शहरासाठी सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित झाला. रोज 80 ते 90 लाख लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते वापरायोग्य करण्याची क्षमता या प्रकल्पाची आहे. त्यासाठी वीजबिलाचा खर्च दरमहा पाच लाख रुपये आहे. या पाण्यावर आणि त्याच्या पाझरावर एक ते दीड हजार हेक्‍टर शेती कडाक्‍याच्या उन्हाळ्यातही फुलते. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
शिर्डी शहराने सार्वजनिक स्वच्छतेत मोठी झेप घेतली. त्यात तत्कालीन मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी समरस होऊन केलेले काम महत्त्वाचे ठरले. त्यांच्या माहितीनुसार, सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प देशपातळीवर स्वच्छतेबाबतची कामगिरी करताना फार महत्त्वाचा ठरला. शहराचे सांडपाणी ही आपल्या देशातील एक मुख्य समस्या आहे. या पाण्याचे व्यवस्थित शुद्धीकरण करणारी नगरपंचायत म्हणून शिर्डीकडे पाहिले जाते. ओला कचरा रोज खतनिर्मिती प्रकल्पात आणला जातो. तो कुजताना त्यातून निघणारा द्रव अत्यंत घातक व आम्लयुक्त असतो. त्याचे काय करायचे, ही समस्या अनेक नगरपालिकांसाठी जिकिरीची ठरते. शिर्डीत नगरपंचायतीने हा विषारी द्रव सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिनीत सोडला. सांडपाण्यात तो मिसळतो. पुढे त्यावर प्रक्रिया झाल्याने ही समस्या दूर झाली. 

साईबाबांच्या शिर्डीने स्वच्छ सर्वेक्षणात सलग दोन वेळा पंधरा कोटी रुपयांचे बक्षीस मिळविले. त्यातून येथील सार्वजनिक स्वच्छतेसाठी आणखी सुविधा उपलब्ध करता येतील. शहसवासीयांचा सहभाग व साईसंस्थानने कर्तव्यभावनेतून पुढे केलेला मदतीचा हात, यामुळे हा टप्पा गाठायला मदत झाली. तथापि, आपण एवढ्यावर समाधानी नाही. देशाला मार्गदर्शक ठरेल असे काम येथे उभे करण्याची तयारी करणार आहोत. 
- आमदार राधाकृष्ण विखे पाटील 

संपादन : अशोक मुरुमकर