एकहाती सत्ता द्या, गावात वरूणास्त्राने पाऊस पाडू, नगरमधील ग्रामपंचायत निवडणुकीतील जाहीरनामा व्हायरल

अशोक निंबाळकर
Friday, 15 January 2021

आज सायंकाळी ग्रामपंचायतीसाठी मतदानप्रक्रिया संपली. परंतु पाथर्डी तालुक्यातील करंजी-करडवाडी या ग्रामपंचायतीमधील एका पॅनलचा जाहीरनामा अजूनही व्हायरल होतो आहे.

अहमदनगर - आमदारकी आणि खासदारकीच्या निवडणुकीपेक्षाही कोणती निवडणूक अवघड असेल तर ती ग्रामपंचायतीची. शेवटचे मत होत नाही तोपर्यंत काय शाळा होईल, हे सांगता येत नाही. भल्या भल्या चाणक्यांनाही ही गावगुंडी कळत नाही.

मोठ्या निवडणुका जाहीरनामा, वचननामा म्हणा नाही तर वचकनामा असे काहीही असेल परंतु विकासाचा मुद्दा घेऊन लढवल्या जातात. यंदा ग्रामपंचायत निवडणुकीतही वचननामे आले. यात विकासाचा मुद्दा कॉमन होता. परंतु नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एका ग्रामपंचायत निवडणूक लढवणाऱ्या पॅनलचा जाहीरनामा भयंकरच होता.

हेही वाचा - भाजपचे चाणक्य रोहित पवारांच्या भेटीला

आज सायंकाळी ग्रामपंचायतीसाठी मतदानप्रक्रिया संपली. परंतु पाथर्डी तालुक्यातील करंजी-करडवाडी या ग्रामपंचायतीमधील एका पॅनलचा जाहीरनामा अजूनही व्हायरल होतो आहे. विदर्भातील एका ग्रामपंचायत सदस्याला मतदार महिलेने झापल्याचा व्हिडिओ व्हायरल व्हायचे थांबत नाही, तसाच हा प्रकार आहे.

तर विषय असा आहे, पाथर्डी तालुक्यातील पश्चिम भागात करंजी आणि शेजारील करडवाडीची ग्रुप ग्रामपंचायत आहे. तेथे नऊ सदस्य आहेत. ग्रामपंचायतीसाठी दोन पॅनल समोरासमोर उभे ठाकले होते. एका पॅनलने अजब जाहीरनामा काढला होता. "आम्हाला गावची संपूर्ण सत्ता द्या, आम्ही तुमच्या गरज पूर्ण करतो. हा परिसर कमी पावसाचा आहे. त्यामुळे वारंवार दुष्काळ पडतो. जर तसे झालेच तर हरिभक्ती यज्ञ, वरूणअस्त्राचा सिद्ध प्रयोग केला जाईल. तसेच पावसाळ्यात हरिनाम सप्ताह केले जातील. याची सर्व जबाबदारी प्रभाग क्रमांक एकमधील उमेदवार घेतील."

हा अजब जाहीरनामा सोशल मीडियात व्हायरल होतो आहे. याबाबत पॅनलचे प्रमुख म्हणतात, "यज्ञ करून आम्ही पाऊस पाडतो. होम-हवन केल्यानंतर पाऊस पडतो, अशी आमची धारणा आहे. नाथभक्तांना हे माहिती आहे. त्यामुळे आश्वासन देण्यात गैर काय..."

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Promise of rain in Gram Panchayat elections