‘योगी- मोदी हाय... हाय'चा संगमनेरमध्ये नारा; युवक कॉंग्रेसची निदर्शने

आनंद गायकवाड
Friday, 2 October 2020

"योगी सरकार डरती हैं... पुलिसको आगे करती हैं..', "योगी, मोदी हाय हाय' अशा घोषणांनी संगमनेर बसस्थानकाचा परिसर दणाणला.

संगमनेर (अहमदनगर) : "योगी सरकार डरती हैं... पुलिसको आगे करती हैं..', "योगी, मोदी हाय हाय' अशा घोषणांनी संगमनेर बसस्थानकाचा परिसर दणाणला. उत्तर प्रदेशच्या सीमेवर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार राहुल गांधी, प्रियांका गांधी, रणजितसिंह सुरजेवाला आदी नेत्यांना दडपशाहीने अटक केल्याच्या निषेधार्थ देशभरात सरकारच्या विरोधात रान पेटले.

याचे तीव्र पडसाद संगमनेरमध्येही उमटले. युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली युवक कॉंग्रेसने आज सायंकाळी साडेसहाच्या सुमारास तीव्र निदर्शने केली. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे .क्लिक करा
बसस्थानक परिसरातील महात्मा गांधी यांच्या प्रतिमेपासून घोषणा देत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ फेरीचा समारोप झाला. सत्यजित तांबे म्हणाले, की उत्तर प्रदेशातील भाजपशासित योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने अत्याचारपीडित दलित युवतीच्या मृतदेहावर रात्री अडीच वाजता तिच्या कुटुंबीयांच्या अनुपस्थितीत, पोलिसांच्या मदतीने अंत्यसंस्कार केले.

या मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन करण्यासाठी निघालेले कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार राहुल गांधी, प्रियांका गांधी, रणजितसिंह सुरजेवाला आदींना योगी सरकारने उत्तर प्रदेशच्या प्रवेशद्वारावरच रोखले. हा भारतीय लोकशाही व राज्यघटनेचा अपमान आहे. लोकशाही प्रणालीत विरोधी पक्षाची मोठी भूमिका असते. मात्र, हुकूमशाही पद्धतीने नरेंद्र मोदी व योगी सरकारने विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. मोदी सरकारची काम करण्याची पद्धत लोकशाहीला काळिमा फासणारी व राज्यघटनेचा अपमान करणारी आहे. 

सुशांतसिंह, रिया चक्रवर्ती, कंगना राणावत यांच्यावर बोलणारे भाजप नेते आज गप्प आहेत. महाराष्ट्रात एका छोट्या गोष्टीवरून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणाऱ्या कंगनाचे समाजासाठी योगदान काय, असा सवाल करून, दंगलराज सुरू असलेल्या उत्तर प्रदेशात महिला-भगिनी सुरक्षित नाहीत. त्यामुळे राष्ट्रपतींनी उत्तर प्रदेशात तातडीने राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी सत्यजित तांबे यांनी केली. 
एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष निखिल पापडेजा, कार्याध्यक्ष सोमेश्वर दिवटे, अजय फटांगरे, सुभाष सांगळे, नितीन अभंग, निर्मला गुंजाळ, अनिस शेख, शैलेश कलंत्री, गौरव डोंगरे, राजेंद्र वाकचौरे, मुश्‍ताक शेख, आनंद वर्पे उपस्थित होते. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Protest of Uttar Pradesh Chief Minister by Congress in Sangamner taluka