esakal | तनपुरे कारखाना कामगारांनी फासले प्रवरेच्या कर्मचाऱ्याच्या तोंडाला काळे
sakal

बोलून बातमी शोधा

protesting workers of tanpure sugar factory put black oil on face of pravara factory official

तनपुरे कारखाना कामगारांनी फासले प्रवरेच्या कर्मचाऱ्याच्या तोंडाला काळे

sakal_logo
By
विलास कुलकर्णी

राहुरी (जि. नगर) : डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या आंदोलक कामगारांनी आज (गुरुवारी) प्रवरा कारखान्याच्या एका अधिकाऱ्याच्या तोंडाला काळे ऑइल फासले. यापुढे प्रवरेचा अधिकारी, कर्मचारी कारखाना व संलग्न संस्थेत आढळले, तर काळ्या ऑइलने अंघोळ घातली जाईल. असा इशारा कामगारांनी दिला.

वेतन व इतर २५ कोटी ३६ लाखांच्या थकित मागणीसाठी तनपुरे कारखान्याच्या कामगारांच्या आंदोलनाचा आजचा अकरावा दिवस गाजला. काल (बुधवारी) तनपुरे साखर कारखान्याच्या आंदोलक कामगारांनी प्रवरेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना 'चले जाव' इशारा दिला होता. तरी, आज (गुरुवारी) सकाळी अकरा वाजता प्रवरेचा एक जण विवेकानंद नर्सिंग होम येथे कामासाठी आल्याची माहिती समजताच संतप्त आंदोलकांनी नर्सिंग होमकडे धाव घेतली. सुमारे दीडशे आंदोलक कामगारांनी नर्सिंग होमचा कानाकोपरा तपासला. प्रवरा कारखान्याचे अकाऊंट विभागातील अविनाश खर्डे यांना कामगारांनी बाहेर काढले. त्यांच्या अंगावर काळे ऑइल ओतण्यासाठी एक आंदोलक कामगार पुढे सरसावला. परंतु, कामगार नेते इंद्रभान पेरणे, सचिन काळे, सिताराम नालकर व इतरांनी संतप्त कामगारांना शांत केले. प्रवरेला संदेश देण्यासाठी खर्डे यांच्या फक्त तोंडाला काळे ऑइल फासावे. असे संतप्त कामगारांना समजावले. खर्डे यांना काळे ऑइल फासल्यावर त्यांना तात्काळ निघून जाण्यास सांगण्यात आले.

हेही वाचा: राज्यसरकारला सद्बुद्धी दे! राधाकृष्ण विखेंचे भगवतीला साकडे

आंदोलनाकडे दुर्लक्ष करणारे कारखान्याचे सर्वेसर्वा खासदार डॉ. सुजय विखे व कारखान्याच्या संचालक मंडळाचा निषेध करून, कामगारांनी शेवटचा रुपया घेईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही. असा इशारा दिला. उद्या (शुक्रवारी) सकाळी अकरा वाजता कामगारांच्या मुलांनी राहुरी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे, आंदोलनाचे दिवस वाढत आहेत. तसतसा कामगारांची व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची सहनशीलता संपू लागली आहे. त्यामुळे, आंदोलनाची तीव्रता दिवसागणिक वाढत आहे.

हेही वाचा: पूरग्रस्तांना केंद्राकडून मदत मिळवून देऊ : खासदार विखे पाटील

loading image
go to top