लॉकडाऊन काळातील वीजबिले माफ करण्यासाठी भाकपतर्फे शेवगावात निदर्शने

सचिन सातपुते
Saturday, 21 November 2020

कोरोनामुळे लागू केलेल्या टाळेबंदीच्या काळातील वीजबिलात सवलत देण्याऐवजी ते सक्तीने वसुलीची तयारी करणाऱ्या महावितरण कंपनीचा निषेध करीत, शासनाने टाळेबंदीच्या काळातील सर्व वीजबिल माफ करावे.

शेवगाव (अहमदनगर) : कोरोनामुळे लागू केलेल्या टाळेबंदीच्या काळातील वीजबिलात सवलत देण्याऐवजी ते सक्तीने वसुलीची तयारी करणाऱ्या महावितरण कंपनीचा निषेध करीत, शासनाने टाळेबंदीच्या काळातील सर्व वीजबिल माफ करावे, या मागणीसाठी शेवगाव येथे महावितरणच्या कार्यालयासमोर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ॲड. सुभाष लांडे, ज्येष्ठ नेते शशिकांत कुलकर्णी, संजय नांगरे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. राज्य सरकारच्या भूमिकेचा निषेध करीत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
कोरोनामुळे मार्च ते ऑगस्ट या टाळेबंदीच्या काळातील वीजबिलात सवलत देण्याची भूमिका राज्य सरकारने जाहीर केली होती. मात्र, ती मागे घेऊन वीजबिलाची सक्तीने वसुली करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. टाळेबंदीमुळे अनेक जणांना रोजगारास मुकावे लागले. त्यातच, उत्पन्नाचे स्रोत बंद झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना वीजबिल भरणे अशक्‍य असताना, याच काळात सरकारने वीज दरवाढीची घोषणा करून त्यानुसार वीजबिले ग्राहकांना देण्यात आली. आता त्यात सवलत देण्याऐवजी सक्तीने वसुलीचा निर्णय महावितरणने घेतल्याने नागरिकांच्या अडचणींत भर पडली आहे. 

कोरोना संसर्गाच्या काळात सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा देण्याऐवजी त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे, अशी टीका ॲड. सुभाष लांडे यांनी केली. विजेची दरवाढ रद्द करावी, टाळेबंदीच्या काळातील व शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करावे, तसेच सक्तीने सुरू असलेली वसुली थांबवावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला. किसान सभेचे जिल्हा उपाध्यक्ष बापूराव राशीनकर, बाजार समितीचे संचालक अशोक नजन, आत्माराम देवढे, दत्ता आरे, रत्नाकर मगर, प्रेम अंधारे, विश्वास हिवाळे, बापूराव लांडे, अक्षय खोमणे आदींसह कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Protests in Shevgaon by electricity bills during lockdown period