बिबट्यापासून बचाव करण्यासाठी वनविभागाकडुन जनजागृती मोहीम

गौरव साळुंके
Monday, 30 November 2020

प्रवरा व गोदावरी नदी परिसरासह तालुक्यातील अनेक भागात बिबट्याचे हल्ले वाढले आहेत.

श्रीरामपूर (अहमदनगर) : प्रवरा व गोदावरी नदी परिसरासह तालुक्यातील अनेक भागात बिबट्याचे हल्ले वाढले आहेत. बिबट्याच्या भीतीने शिवारातील शेतीकामे करणे अवघड बनले आहे.

शेतवस्त्यावरील लहान बालकांसह शेळ्या- मेंढ्या, कालवडी आणि पाळीव कुत्र्यांवर बिबट्याने हल्ले केली आहे. बिबट्याचे सर्वेक्षण करुन ठिकठिकाणी पिंजरे लावावे. तसेच कायम स्वरुपासाठी बिबट्याच्या बंदोबस्ताची मागणी ग्रामस्थांतुन होत आहे.

तालुक्यातील निमगावखैरी शिवारात पिंजरयात अडलेला बिबट्या गोदावरी नदी परिसरातील नाऊर शिवारात सोडल्याने ग्रामस्थांनी संताप केला आहे. त्यामुळे वनविभागाने बिबट्यापासून बचावासाठी आता सोशल मिडीयाद्वारे जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातील सोशल मिडीया विविध ग्रुपमधुन व्हिडीओद्वारे शेतकरी आणि ग्रामस्थांना बिबट्यापासून बचावासाठी जनजागृती होत आहे.

बिबट्यापासून असा करा बचाव

बिबट्याचा आढळलेल्या शिवारात हातात घुंगराची काठी अथवा बॅटरीचा वापर करावा. रस्त्याने जाताना मोबाईल किंवा रेडीओवर गाणी वाजवावे. त्यामुळे बिबट्याला नागरी वास्तव्याची चाहुल होवून तो आपला रस्ता बदलेल. परिणामी बिबट्याचा हल्ला होणार नाहीत. रात्रीच्यावेळी घराबाहेर अथवा अंगणात उघड्यावर झोपू नका. घराच्या अंगणाला जाळीचे बंदीस्त कुंपण करावे. उघड्यावर शौचाला जावू नये. बिबट्या आपल्या उंचीच्या किंवा कमी उंचीच्या व्यक्ती आणि प्राण्यांना भक्ष समजुन हल्ला करतो. त्यामुळे बंदिस्त शौचालयाचा वापर करावा. उस लागवड करताना उसाचे पिक आणि घराचा 25 फूटाचा अंतर ठेवावा.

बिबट्याच्या परिसरात लहान मुलांवर विशेष लक्ष ठेवावे. मुलांना एकटे आंगणात किंवा घराबाहेर सोडु नका. लहान मुलांसोबत पालकांनी नेहमी रहावे. राहत्या घरासमोरील आंगणाला चौबाजूने बंदिस्त जाळीचे कुंपण करावे. त्यामुळे मुलांना घरासमोर मोकळेपणाने खेळता येईल. पाळीव प्राणी बिबट्याचे मुख्य भक्ष असल्याने त्यांना बंदिस्त गोठ्यात बांधावे. परिणामी बिबट्या घरासमोर फिरणार नाही. घरासमोरील वाढलेल्या गवतासह अन्य झुडपे काढावेत. घराचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा. त्यामुळे बिबट्याला लपण्यास जागा मिळणार नाही. घाणीमुळे कुत्री, डुकर, खुशी, उंदीर प्राणी घराजवळ येतात. त्यांना खाण्यासाठी त्यामागे बिबट्या घराकडे येतो.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
लहान मुलांनी शाळेत जाताना अथवा बाहेर फिरताना समुहाने राहावे. तसेच रस्त्याने गाणी गात चालावे. मोठ्या आवाजाने बोलत चालावे. बिबट्याचा आढलेल्या क्षेत्रात घराच्या परिसरात विजेचे दिवे लावावेत. त्यामुळे प्रकाशाच्या दिशेला बिबट्या फिरकणार नाही. बिबट्या दिसल्यास त्याचा पाठलाग करु नका. तातडीने 1926 आपत्कालीन संपर्क क्रमांकावर वनविभागाला कळवा. पाठलाग केल्यास बिबट्या घाबरुन प्रति हल्ला करु शकतो. शेतीचे अनेक कामे खाली बसून करावी लागतात. त्यामुळे बिबट्या आढळलेल्या परिसरात शेतमजूरांनी सर्तक राहावे.

उस तोडणीच्या वेळी बिबट्याचे बछडे आढल्यास तातडीने वनविभागाला कळवा. बिबट्याच्या पिलांना हाताळू नका. तसेच त्यांचे फोटो अथवा सेल्फी काढु नका. तसेच बिबट्या विहीरीमध्ये पडल्यास तातडीने वनविभागाला कळवा. विहीरीसमोर गर्दी-गोंधळ करणे टाळा. अडकलेल्या बिबट्याची सुटकेसाठी वनविभागाला सहकार्य करावे. पिंजरयात जेरबंद केलेल्या बिबट्याला छेडू नका. पिंजरयातील बिबट्याचे फोटो काढु नका.

बिबट्यासंदर्भात चुकीच्या अफवा पसरवू नका. बिबट्याचा हल्ला रोखण्यासाठी मेंढपाळांनी दक्षता बाळगावी. बिबट्याच्या परिसरात उसतोड मजूरांनी काळजी घ्यावी. सूर्योदयापुर्वी आणि सूर्यास्तानंतर उस तोडणी करु नये, असे आवाहन वनविभागाने केले आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Public awareness campaign by Forest Department to prevent leopards