esakal | शेवगाव तालुक्यात ९२ हजार २०४ क्विंटल कापसाच्या खरेदीतून ५० कोटींची उलाढाल
sakal

बोलून बातमी शोधा

Purchase of 92 thousand 204 quintals of cotton in Shevgaon taluka

शेवगाव तालुक्यात केंद्र सरकारच्या भारतीय कपास निगम व राज्य सरकारच्या कापूस एकाधिकार योजना व खाजी जिनींग व्यावसायिकांमार्फत आतापर्यंत सुमारे ९२ हजार २०४ क्विंटलची कापूस खरेदी झाली आहे.

शेवगाव तालुक्यात ९२ हजार २०४ क्विंटल कापसाच्या खरेदीतून ५० कोटींची उलाढाल

sakal_logo
By
सचिन सातपुते

शेवगाव (अहमदनगर) : पांढऱ्या सोन्याचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेवगाव तालुक्यात केंद्र सरकारच्या भारतीय कपास निगम व राज्य सरकारच्या कापूस एकाधिकार योजना व खाजी जिनींग व्यावसायिकांमार्फत आतापर्यंत सुमारे ९२ हजार २०४ क्विंटलची कापूस खरेदी झाली आहे.

 
त्यामाध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांना साधारण ५० कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. सरकारच्या खेरदी केंद्रावर कापूस घालण्यासाठी आतापर्यंत १० हजार ६६८ शेतकऱ्यांनी नाव नोंदणी केली.

त्यातील दोन हजार ४६२ शेतकऱ्यांचा ५१ हजार ५४ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. तर अदयापही नोंदणी केलेल्या आठ हजार २०६ शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी होणे बाकी आहे. 

शेवगाव तालुक्यात काही वर्षापासून कपाशीची लागवड वाढली असून यावर्षी ४१ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशी लागवड करण्यात आली. संततधार पावसामुळे काही अंशी कपाशीच्या उत्पन्नाला फटका बसला असून शेतक-यांनी कापूस काढून इतर रब्बीचे पिके घेण्यावर भर दिला आहे. कापसाच्या वाढत्या उत्पन्नामुळे शेवगाव शहरासह बोधेगाव, बालमटाकळी, चापडगाव या भागात कापसाच्या गाठी बनवणारे जिनींग प्रेसींग, तर सरकीपासून तेल व पेंड निर्मीतीसाठीही आँईलमील असे उदयोग उभे राहीले आहेत. त्यामुळे अनेक जणांना रोजगारही मिळू लागला आहे.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
केंद्र सरकारने सी. सी. आय. मार्फत तालुक्यात १९ नोव्हेंबरपासून तर राज्य सरकारने फेडरेशन मार्फत २८ नोव्हेंबरपासून कापूस खरेदी केंद्र सुरु केले आहे. सी. सी. आयने शहरातील रिध्दी सिध्दी व दुर्गा या दोन जिनींगमध्ये आतापर्यंत ४१ हजार १९२ तर राज्य सरकारने फेडरेशन मार्फत मारुतराव घुले पा. जिनींगमध्ये ९ हजार ८६२ क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. या दोन्ही सरकारी खरेदी केंद्रावर कापसाला प्रतिक्विंटल पाच हजार ४०० ते पाच हजार ७२५ रुपये भाव आहे. 

खाजगी व्यापारी पाच हजारच्या आसपास दराने कापूस खरेदी करतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल सरकारी खरेदी केंद्राकडे आहे. मात्र तेथेही यावर्षीच्या पावसाने भिजलेल्या कापसाची आद्रता व प्रतवारी पाहून चांगल्या कापसाला प्राधान्य दिले जात असल्याने कमी दर्जाच्या कापसाला खाजगी व्यापाऱ्यांकडे देण्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नाही. सध्या पावसाळी वातावरण व कापूस साठवण्यासाठी गोडाऊन उपलब्ध नसल्याने तीन ते चार दिवस सरकारी कापूस खरेदी केंद्र बंद ठेवण्यात आले आहे. 

सरकारी खरेदी केंद्रामुळे खाजगी व्यापाऱ्यांनाही त्या तुलनेत पाच हजाराच्या आसपास भाव दयावा लागत असल्याने शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत आहे. अदयापही अनेक शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक असून आर्थिक आवश्यकतेनुसार शेतकरी कापूस विक्रीसाठी बाहेर काढतील. शेतकऱ्यांनी खाजगी व्यापाऱ्यांऐवजी सरकारी खरेदी केंद्रावर कापूस विक्रीसाठी आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती अनिल मडके व सचिव अविनाश म्हस्के केले आहे. 

इतर जिनींग व्यावसायिकांमार्फत खरेदी करण्यात आलेला कापूस (क्विंटलमध्ये) : हनुमान - ११०००, अन्नपूर्णा कोटेक्स -३७००, रिध्दी- सिध्दी - १२०५०, दुर्गा - ८७००, कल्पतरु चापडगाव -२५००, साई कोटेक्स बालमटाकळी - ३२००.

संपादन : अशोक मुरुमकर