ढगाळ हवामान कमी झालेली थंडी अन्‌ पहाटेच्या वेळी पडणाऱ्या धुक्यांमुळे रब्बीची पिके रोगराईच्या विळख्यात

राजू घुगरे
Saturday, 2 January 2021

ढगाळ हवामान, कमी झालेली थंडी, पहाटेच्या वेळी पडणारे धुके, सुर्यप्रकाशाचा अभाव यामुळे रब्बीची विविध पिके रोगराईच्या विळख्यात सापडली असल्याने त्यावरील औषध फवारणीसाठी शेतक-यांची धावपळ सुरु झाली आहे.

शेवगाव (अहमदनगर) : ढगाळ हवामान, कमी झालेली थंडी, पहाटेच्या वेळी पडणारे धुके, सुर्यप्रकाशाचा अभाव यामुळे रब्बीची विविध पिके रोगराईच्या विळख्यात सापडली असल्याने त्यावरील औषध फवारणीसाठी शेतक-यांची धावपळ सुरु झाली आहे.

यंदा अतिवृष्टीने खरीप पिकांना फटका बसल्यानंतर रब्बी पिकाखालील क्षेत्रात वाढ झाली असली तरी रोगराईच्या विळख्यामुळे त्यावरील खर्चात वाढ झाली आहे.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
जुन पासून तालुक्यातील सर्वच मंडलात मोठया प्रमाणावर अतिवृष्टी झाल्यामुळे खरीपाची पिके वाया गेली आहेत. कपाशीचे पिक ही हंगामपूर्ण होण्याआधीच काढून टाकण्याची वेळ शेतकऱ्यावर आली.

पावसाळा संपल्यानंतर खरीपाची पिके काढून ज्वारी, हरभरा, गहू, कांदा, ऊस यासह रब्बी पिकाची मोठया प्रमाणावर तालुक्यात पेरणी झाली. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार तालुक्यात हरभ-याची 5847, गहू- 5516, ज्वारी -5887, कांदा - 2123, ऊस- 7996, मका-799 हेक्टरवर पेरणी व लागवड झाली आहे. सध्या ही पिके जोमात आली असूनही ढगाळ हवामान, कमी झालेली थंडी, जमिनीतील आद्रतेमुळे तयार झालेली बुरशी, सुर्यप्रकाशाचा अभाव यामुळे गव्हावर करपा, खोडकिडा, तांबेरा, हरभ-यावर अळया तर ज्वारीच्या पिकावर चिकटा,मावा,लष्करी अळी या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. 

रब्बीच्या पिकासाठी पोषक असलेली थंडी गेल्या अठवडयापासून गायब झाल्याने व पहाटेच्या वेळी धुके पडू लागल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. खरीपाची पिके काढून रब्बी पिकांच्या पेरणी व मशागतीसाठी शेतक-यांनी मोठया प्रमाणावर खर्च केला आहे. 

समाधानकारक पावसामुळे विहीर व कुपनलिका यांच्याचील पाणी पातळी ही चांगली आहे. मात्र विचीत्र हवामानाने या पिकांना चांगला फटका बसला आहे. शेतक-यांची पिकावरील रोगराईमुळे फवारणीसाठी धावपळ सुरु झाली आहे. त्यामुळे पिकांवरील खर्चातही वाढ झाली आहे. एका फवारणीसाठी एकरी ज्वारीसाठी 300 ते 500 रुपये तर गहू हरभ-यासाठी 500 ते 1 हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. हवामान बदल यापुढेही कायम राहील्या पिकावरील उत्पादन खर्चातही मोठया प्रमाणावर वाढ होणार आहे. त्याप्रमाणात शेतक-यांच्या हाती नेमके किती उत्पन्न मिळेल याबाबत साशंकता आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rabi crop disease due to fog in Shevgaon area