esakal | मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून थोरातांचा अब्रू झाकण्याचा प्रयत्न

बोलून बातमी शोधा

राधाकृष्ण विखे पाटील

मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून थोरातांचा अब्रू झाकण्याचा प्रयत्न

sakal_logo
By
सतीश वैजापूरकर

राहाता ः ""महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र म्हणजे कोविड संकटात स्वतःची अब्रू झाकण्याचा प्रकार आहे. एक वर्षापासून हे संकट असताना त्यांना सुविधांचा अभाव असल्याचा साक्षात्कार आज झाला का,'' अशी टीका भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

लोणीतील विखे पाटील महाविद्यालयात सुरू केलेल्या कोविड सेंटरचा प्रारंभ कीर्तनकार उद्धव महाराज मंडलिक व प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर विखे पाटील पत्रकारांशी बोलत होते.

माजी आमदार अण्णासाहेब म्हस्के, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी विखे पाटील, प्रवरा मेडिकल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र विखे पाटील, शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब जेजूरकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, शिर्डी संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, गणेश कारखान्याचे अध्यक्ष मुकुंद सदाफळ, प्रवरा कारखान्याचे उपाध्यक्ष विश्‍वास कडू, सभापती नंदा तांबे, कैलास कोते, रामभाऊ भुसाळ उपस्थित होते.

विखे पाटील म्हणाले, ""मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतरही गरजूंना धान्य मिळाले नाही. सामान्य माणसाची उपासमार सुरू आहे. एकीकडे राज्यात सर्वाधिक लसीकरण झाले म्हणून राज्य सरकार पाठ थोपटून घेत आहे. केंद्राच्या सहकार्याशिवाय हे झाले आहे का?''

उद्धव महाराज मंडलिक म्हणाले, की संयम, नियम आणि बंधने पाळून या संकटाचा सामना सर्वांना करावा लागत आहे. विखे पाटील परिवाराने या संकटाच्या काळात समाजाला आपले मानले. निवृत्ती महाराज देशमुख यांचेही भाषण झाले.

प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आणलेले रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन व त्याबाबत सुरू असलेली चौकशी, याबाबत आपण भाष्य करणार नाही. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वसतिगृहात सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये 400 बेड आहेत. त्यात लवकरच ऑक्‍सिजनची सुविधा असलेले 90 बेड उपलब्ध करून दिले जातील.

- राधाकृष्ण विखे पाटील, आमदार