esakal | 'काम द्या' मागणीसाठी रेल्वे हमालांचे ७ सप्टेंबरला सहकुटुंब उपोषण
sakal

बोलून बातमी शोधा

tarin

'काम द्या' मागणीसाठी रेल्वे हमालांचे ७ सप्टेंबरला सहकुटुंब उपोषण

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

अहमदनगर : रेल्वेने मालाची वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांनी दुसऱ्या स्थानकावर माल उतरवून वाहतूक सुरू केली आहे. त्यामुळे रेल्वे मालधक्‍क्‍यावरील हमालांनी ता. ७ सप्टेंबरला "काम द्या' या मागणीसाठी कुटुंबासह जिल्हाधिकारी उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती कॉ. बहिरनाथ वाकळे आणि कॉ. महेबूब सय्यद यांनी दिली.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या 'सिटू' संलग्न 'रेल्वे माथाडी व कॉंट्रॅक्‍ट लेबर युनियन'च्या वतीने हमाल माथाडी कामगारांची बैठक संपन्न झाली. कोरोनाच्या पहिल्या लाटेत हमाल-माथाडी कामगारांनी आपल्या जीवाची पर्वा न करता शेतीसाठी लागणारी खते, अन्नधान्य तसेच सिमेंट आदी माल उतरवला. जिल्ह्याची संकटकाळाची गरज भागवली. वाढत्या महागाई नुसार त्यांच्या हक्काची त्रैवार्षिक दरवाढ करणे गरजेचे असताना आता त्यांची अडवणूक केली जात आहे.

हेही वाचा: राज्यसरकारला सद्बुद्धी दे! राधाकृष्ण विखेंचे भगवतीला साकडे

मालधक्‍क्‍यावरील माथाडी कामगार आणि हुंडेकरी व वाहतूक ठेकेदार यांच्यामध्ये अनेकदा बोलणी झाली, पण करार होऊ शकला नाही. सहाय्यक कामगार आयुक्त तथा अध्यक्ष, माथाडी कामगार मंडळ, अहमदनगर यांनी "इतर जिल्ह्यातील रेल्वे मालधक्‍यावरील प्रचलित दरांचा सांगोपांग विचार करून' कामकाज सुरळीत होण्यासाठी ता. २८ जुलै रोजी मजुरी व वाराईचे दर निश्‍चित करून काम सुरू करण्याचे आदेश दिले. हुंडेकरी व माल वाहतूकदार हे खत कंपन्या अधिकारी, सरकारी कृषी अधिकारी यासारख्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने अहमदनगर रेल्वे मालधक्‍क्‍यावर येणारा माल बाहेरगावीच उतरवून घेत आहेत. रेल्वे हमालांना उपाशी ठेवण्याचे कारस्थान सुरू केले आहे. या प्रश्‍नाकडे लक्ष वेधण्यासाठी रेल्वे माथाडी व कॉंट्रॅक्‍ट लेबर युनियन तर्फे ता.७ सप्टेंबर जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत उपोषण आयोजित करण्यात आले आहे. क्रांतिसिंह कामगार संघटनेचे कॉ. रामदास वागस्कर, कॉ. राजू कांबळे, नगरसेवक प्रशांत गायकवाड, विलास उबाळे आणि गणेश कंटूर, सुरेश निरभुवणे, संजय पाडळे, शरद वाकचौरे, गणेश जाधव, संभाजी कोतकर, पोपट लोंढे, सागर पोळ, मधुकर पाटोळे आदींनी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा: 'गवळींनी ट्रस्टची ७० कोटींची संंपत्ती पीएच्या नावावर केली'

loading image
go to top